प्रतिनिधी /बेळगाव
सोने खरेदीसाठी पोस्ट विभागाने आरबीआयच्या सहकार्याने गोल्ड बॉण्ड विक्री केले होते. 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत गोल्ड बॉण्ड विक्री करण्यात आली. यातून बेळगाव पोस्ट विभागाला 6.50 कोटी रुपये जमा झाले आहेत. बेळगाव पोस्ट विभागाने देशात सर्वाधिक बॉण्डची विक्री करून अव्वल स्थान मिळविले आहे.
सोने खरेदी करण्यासाठी पोस्ट विभागाने गोल्ड बॉण्ड ही योजना मागील अनेक वर्षांपासून सुरू केली आहे. ठरलेल्या कालावधीत हा सोने बॉण्ड खरेदी केला जाऊ शकतो. 1 ग्रॅम पासून 4 हजार ग्रॅमपर्यंत सोने खरेदी करता येते. एकदा भरलेली रक्कम पाच वर्षांपर्यंत काढता येत नाही. भरलेल्या रकमेवर 2.5 टक्के व्याज देखील दिले जाते. 5 वर्षानंतर त्या वेळच्या सोन्याच्या किमतीप्रमाणे ग्राहकाला पैसे दिले जातात. यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड व बँक पासबुकची आवश्यकता आहे.
वर्षातून तीन ते चार वेळा गोल्ड बॉण्ड विक्री केली जाते. यावेळी 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान गोल्ड बॉण्डची विक्री करण्यात आली. बेळगाव विभागातील 69 पोस्ट ऑफिसमध्ये गोल्ड बॉण्डची विक्री करण्यात आली. यामध्ये बेळगाव शहरात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. सोने खरेदी करून ते चोरी होण्याची भीती असल्याने नागरिकांनी गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक केल्याचे पोस्ट विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
नागरिकांचा पोस्ट विभागावर विश्वास – एच. बी. हसबी (पोस्ट अधीक्षक, बेळगाव विभाग)
नागरिकांचा पोस्ट विभागावर विश्वास असल्यामुळेच गोल्ड बॉण्डची आम्ही विक्री करू शकलो. शहरासोबतच ग्रामीण भागातही या योजनेला उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे. बेळगाव विभागात एकूण 1299 ग्राहकांनी तब्बल 13 किलो 718 ग्रॅम सोने खरेदी केले आहे. यामुळेच देशात प्रथम येण्याचा मान बेळगाव विभागाला मिळाला आहे. यापुढेही अधिकाधिक महसूल जमा करण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास एच. बी. हसबी यांनी व्यक्त केला.









