
प्रतिनिधी /बेळगाव
हिंदी चित्रपट क्षेत्रात 1970 चा काळ हा अजरामर गीतांमुळे सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा होता. हाच काळ ‘गोल्डन व्हाईस ऑफ बेलगाम’ या स्पर्धेमुळे बेळगावकरांना पुन्हा एकदा अनुभवता आला. एकाहून एक अशी सरस गीते स्पर्धकांनी सादर करत रसिकांची वाहवा मिळविली. उपांत्य पूर्व फेरीत 8 संघांनी आपली गीते सादर केली. त्यापैकी 6 संघ पुढील फेरीसाठी निवडले गेले.
लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी प्रस्तुत व रसिकरंजन आयोजित गोल्डन व्हॉईस ऑफ बेळगाम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी रविवारी पार पडली. कोनवाळगल्ली येथील लोकमान्य रंगमंदीर येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला तरुण भारत मिडिया पार्टनर तर हॉस्पिटॅलिटी पार्टनर हॉटेल समुद्र होते. उपांत्यपूर्व फेरीचे उद्घाटन रसिकरंजनचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या हस्ते झाले.
एसकेई सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल रसिक रंजनचे अध्यक्ष किरण ठाकुर यांचा रसिक रंजन परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी रंसिक रंजनचे कार्याध्यक्ष प्रा. अनिल चौधरी, नितीन नेर्लेकर, नितीन कपिलेश्वरकर, आर. आर. कुलकर्णी, भारती कित्तूर, स्वाती हुद्दार, अशोक केळकर, सुरेश कनगाळी, मकरंद बापट, सचिन पवार, परशराम माळी, विजय तमूचे, जी. डी. कुलकर्णी, लोकमान्य सोसायटीचे संचालक अजित गरगट्टी, गजानन धामणेकर, प्रभाकर पाटकर, सुबोध गावडे, पंढरी परब उपस्थित होते. राष्ट्रीय कन्यादिनाचे औचित्य साधून स्पर्धक कन्यांना शुभेच्छा देत भेटवस्तू देण्यात आली.
आरपीडीमध्ये होणार ‘म्युझिक स्कूल’
आरपीडी कॉलेजमध्ये सध्या अनेक नवे उपक्रम राबविले जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना दिवस शिक्षण घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना नाईट कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. क्रिडा स्पर्धांसाठी आरपीडीचे मैदान खुले केले जाणार आहे. बेळगावमधील संगीत प्रेमींना संगीताचे शिक्षण घेता यावे, यासाठी ‘म्युझिक स्कूल’ ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती किरण ठाकुर यांनी दिली.
भारती कित्तूर, आर. आर. कुलकर्णी व प्रा. अनिल चौधरी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमान्य सोसायटीचे समन्वयक विनायक जाधव यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीया हुद्दार हिने केले. यावेळी बेळगाव परिसरातील संगीत रसिक उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल
एकूण 8 संघांपैकी 6 संघ उपांत्य फेरीसाठी निवडण्यात आले. प्रत्येक संघाने दिलेल्या संगीतकाराची गीते सादर केली. टीम मारवा, कल्याण, बसंत, भूपाळी, जोग, शिरंजनी हे संघ पुढील फेरीसाठी निवडण्यात आले आहेत.
चॉकलेट हिरोला वाढदिवसानिमित्त सलाम
भारतीय चित्रपटसृष्टी देवआनंद यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही. या चॉकलेट हिरोने आपल्या बहारदार अभिनयाने तो काळ अजरामर केला. त्यामुळे त्यांच्या चित्रपटाची गीते आजही लोकांमध्ये रूळली आहेत. रविवारी त्यांचा वाढदिवस असल्याने ‘व्हाईस ऑफ बेलगाम’ च्या उपांत्य फेरीची सुरूवात त्यांच्या सदाबहार अशा गितांनी झाली. गाता रहे मेरा दिल, कभिना जाओ छोडकर, दिलका भवर करे पुकार, मै जिंदगी साथ निभाता चला गया अशी एकाहून एक सरस गीते श्रीवत्स हुद्दार व तन्मयी सराफ यांनी सादर करून रसिकांची वाहवा मिळविली.
तरुण भारतच्या थेट प्रक्षेपणाला परदेशातूनही प्रतिसाद रसिकांना घरबसल्या गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा यासाठी तरुण भारत तर्फे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. तरुण भारतच्या ‘तरुण भारत न्यूज, बेळगाव’ या फेसबूक पेजवर तर ‘तरुण भारत न्यूज’ या यू टय़ूब चॅनलवरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. केवळ भारतातच नव्हे तर भारता बाहेरूनही अनेक संगीत रसिक या थेट प्रक्षेपणाचा आस्वाद घेत होते. कुवेत येथील एका मराठी रसिकाने कमेंट करून हा कार्यक्रम आवडल्याचे सांगितले.









