डॉ. राजेंद्र भांडणकर यांचे प्रतिपादन, स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते झाले उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
हिंदी चित्रपट गीतांचा सुवर्णकाळ म्हणजे 1970 पूर्वीची गाणी. ही सदाबहार गीते आजही लोकांच्या मनामध्ये रूळली आहेत. ही गाणी आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमान्य सोसायटी व रसिक रंजनने युवा गायकांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांचे कौतुक करून यामुळे जुनी गीते नव्या पिढीपर्यंत पोहोचतील, असा विश्वास केएलई स्कूलचे संचालक व नामवंत ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. राजेंद्र भांडणकर यांनी व्यक्त केला.
लोकमान्य सोसायटी प्रायोजित रसिक रंजन आयोजित ‘गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम’ सत्र 4 थे या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी थाटात करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भांडणकर बोलत होते. लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर, प्रभाकर पाटकर, अजित गरगट्टी, रसिक रंजनचे नितिन कपिलेश्वरी, कर्नल दीपक गुरूंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लोकमान्य सोसायटीतर्फे डॉ. राजेंद्र भांडणकर यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा. अनिल चौधरी प्रास्ताविकात म्हणाले, आजच्या पिढीतील गायक व कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी लोकमान्य सोसायटी व रसिक रंजनतर्फे मागील तीन सत्रे यशस्वीरित्या गोल्डन व्हाईस ऑफ बेलगाम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संगीतातील अनमोल ठेवा पुढील पिढीला मिळावा, हा आमचा प्रयत्न आहे. दर्जेदार संगीत काय असते, हे जुन्या संगीतकारांनी दाखवून दिले आहे. त्याचे स्वरूप आताच्या पिढीला समजावे याकडे आमचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
समन्वयक विनायक जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत करत पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रेया हुद्दार हिने आभार मानले. पहिल्याच दिवशीच्या स्पर्धेत 14 संघांची ऑडिशन राऊंड घेण्यात आली. यातील 12 संघांची उपउपांत्य फेरीसाठी निवड केली जाणार आहे. यावेळी लोकमान्य सोसायटीचे रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी, सी. आर. पाटील, सत्यव्रत नाईक, डी. पी. जोशी, भारती कित्तूर, आर. आर. कुलकर्णी, अशोक केळकर, परशराम माळी, मकरंद बापट, विजय तमुचे, गुरू पेडणेकर यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.









