आयसीसी क्रमवारीत इंग्लंडच्या बर्न्स, पोप, बटलर यांचीही प्रगती
वृत्तसंस्था/ दुबई
विंडीजविरुद्ध झालेल्या शेवटच्या कसोटीत शानदार प्रदर्शन करणाऱया इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये सात स्थानांची प्रगती करीत तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे.
इंग्लंडने ही कसोटी जिंकून मालिकाही जिंकली. त्यात ब्रॉडने 10 बळी मिळविले आणि कसोटी कारकिर्दीतील पाचशे बळींचा टप्पाही पार केला. ऑगस्ट 2016 नंतर त्याने मिळविलेले हे सर्वोच्च मानांकन आहे. त्यावेळीही त्याने तिसरे स्थान मिळविले होते. फलंदाजीतही त्याने 45 चेंडूत 62 धावा फटकावत इंग्लंडतर्फे संयुक्त तिसऱया क्रमांकाचे जलद अर्धशतक नोंदवले. या कामगिरीने फलंदाजीच्या मानांकनातही त्याने सात स्थानांची आणि अष्टपैलूंमध्ये तीन स्थानांची प्रगती करीत 11 वे स्थान मिळविले आहे. इंग्लंडचा बर्न्स 17 व्या स्थानावर पोहोचला असून पहिल्यांदाच तो टॉप 20 मध्ये पोहोचला आहे. याशिवाय ओली पोप (46 वे), जोस बटलर (44) यांनीही फलंदाजी क्रमवारीत प्रगती केली आहे.
भारतीय क्रिकेटपटूंचे टॉप टेन फलंदाजांमधील स्थान मात्र कायम राहिले आहे. स्टीव्ह स्मिथनंतर कर्णधार विराट कोहली दुसऱया तर चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे अनुक्रमे सातव्या व नवव्या स्थानावर कायम आहेत. अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन यांनी तिसरे व पाचवे स्थान राखले आहे. गोलंदाजीत ब्रॉडने सात स्थानांची झेप घेतल्यामुळे भारताच्या जसप्रित बुमराहची घसरण झाली असून तो आता आठव्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या ख्रिस वोक्सनेही प्रगती केली असून 654 रेटिंग गुणांसह त्याने 20 वे स्थान मिळविले आहे. विंडीजचा फलंदाज शाय होपने (68) दोन तर गोलंदाज केमार रोशने (15) एका स्थानाची प्रगती केली आहे.









