वृत्तसंस्था / मुंबई
दोन्ही संघांत जागतिक दर्जाचे अव्वल गोलंदाज असल्याने त्यांच्या कामगिरीवरच भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा निकाल अवलंबून राहील, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने व्यक्त केले आहे.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात असून तेथे हा संघ पूर्ण लांबीची मालिका खेळणार आहे. त्यात 3 वनडे, 3 टी-20 व चार कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. 27 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने या दौऱयाची सुरुवात होणार आहे. जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स असे गोलंदाज असल्याने दोन्ही संघ गोलंदाजीत बलवान आहेत. ‘ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांत बाऊन्स व वेग दोन्ही पहावयास मिळतो. त्यामुळे वनडे, टी-20 व कसोटी मालिकेचा निकाल गोलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावसंख्येत रोखणारा संघ सरस ठरू शकेल,’ असे झहीर म्हणाला.
डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ संघात परतले असल्याने ऑस्ट्रेलियाची ताकद वाढली आहे, त्यामुळे या मालिकेत भारताची खरोखरच कठीण परीक्षा होणार आहे. 2018-19 मध्ये झालेल्या मागील दौऱयात भारताने ऑस्ट्रेलियाला स्मिथ व वॉर्नर यांच्या गैरहजेरीत कसोटी मालिकेत 2-1 असे हरविले होते. बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे या दोघांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे ते संघाबाहेर होते. ‘त्यांचे पुनरागमन झाले असल्याने भारताला आता त्यांच्याकडून कडवा प्रतिकार होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मागील वेळेपेक्षा हा दौरा भारतासाठी कठीण असणार आहे,’ असे झहीरला वाटते.
‘दोन्ही संघांत फलंदाजी व गोलंदाजी विभागात दर्जेदार खेळाडू असल्याने या मालिकेचे भाकीत करणे कठीण आहे. त्यामुळे फेव्हरिट संघ कोणता असेल, हे सांगता येणार नाही. त्यामुळेच या दौऱयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून त्यातील रोमांच व उत्सुकता वाढत चालली आहे,’ असा विचारही त्याने मांडला. त्याच्या मताला ऑस्ट्रेलियाचा माजी महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रानेही सहमती दर्शविली. विराट कोहलीच्या टीम इंडियाला यावेळी ऑस्ट्रेलियाच्या कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागणार असल्याचे त्याला वाटते. ‘स्मिथ, वॉर्नर संघात परतल्याने ऑस्ट्रेलियाची ताकद वाढली असून भारतीय संघही तितक्याच ताकदीचा आहे. त्यांच्याकडे आक्रमक मानसिकता आणि मालिका जिंकण्याचा दृढनिश्चियही आहे. या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन वातावरणात खेळण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. कारण येथे यश कसे मिळवायचे याचा चांगला अनुभव त्यांना मागील दौऱयात मिळाला आहे,’ असे मॅकग्रा म्हणाला. भारताचा माजी फलंदाज व समालोचक संजय मांजरेकरनेही असेच विचार व्यक्त केले. मागील वेळेपेक्षा यावेळचा ऑस्ट्रेलियन संघ बलाढय़ असल्याने भारताला यशासाठी सरस प्रदर्शन करणे क्रमप्राप्त असेल, असे तो म्हणाला. सोनी वाहिनीने ‘एक्स्ट्रा इनिंग्ज’ हा शो पुन्हा सुरू करणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले असून त्यात मॅकग्रा, मांजरेकर, अजय जडेजा, सेहवाग, झहीर, निक नाईट, मोहम्मद कैफ, मुरली कार्तिक, विवेक राजदान, अजित आगरकर, विजय दाहिया या माजी खेळाडूंचा, याशिवाय हर्षा भोगले, अर्जुन पंडित व एरिन हॉलंड यांचा त्यात समावेश आहे.









