वडूज/प्रतिनिधी
गोरेगांव (निमसोड) ता. खटाव येथील कृषी विभाग व बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीकरीता गावातील प्रमुख कार्यकर्ते शनिवार दि. 15 ऑगस्ट रोजी वडूज येथील तहसिलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत.
याबाबत नागरीकांनी दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी, गोरेगांव येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान पदाधिकार्यांनी प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्यांना हाताशी धरुन कृषी खाते तसेच बांधकाम खात्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. कृषी विभागाने गरजू लाभाथ्यांना डावलून सक्षम लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला आहे. या लोकांनी शासकीय अनुदानातून मिळालेल्या साहित्याची परस्पर विक्री केली आहे. सरपंच पाणलोटचे अध्यक्ष असताना त्यांनी स्वत:ची वाहने वापरुन अंतर्गत पाईपलाईन व इतर कामात लाभ घेतला आहे. तसेच सरपंचांनी अंबवडे-गोरेगांव रस्त्याच्या कामासाठी पदाचा गैरवापर करुन वनविभागाच्या हद्दीतील मुरमाची ठेकेदारास बेकायदेशी विक्री केली आहे. याशिवाय चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून मोठ्या प्रमाणावर बोगस कामे करुन निधी लाटण्याचा प्रयत्न केला आहे. निवेदनावर विक्रमराज डोईफोडे, विठ्ठल नलवडे, धैर्यशिल डोईफोडे, शिवाजी डोईफोडे आदिंसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.