ऑनलाईन टीम / काठमांडू :
भारतीय लष्करातील गोरखा जवानांनी चीनविरोधात लढू नये, असे आवाहन नेपाळमधील कम्युनिस्ट पक्षाचा नेता नेत्रा बिक्रम चंद यांनी केले आहे. नेत्रा हा डाव्या विचारसणीचा नेता असून, त्याला मानणारा एक वर्ग नेपाळमध्ये आहे. नेपाळ सरकारने त्याच्या संघटनेवर बंदी घातली असून, तो भूमिगत झाला आहे.
भारत-चीनमधील हिंसक संघर्षानंतर भारतीय लष्कराकडून सुट्टीवर गेलेल्या गोरखा रेजिमेंटमधील जवानांना तात्काळ ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे भारतीय लष्करातील गोरखा जवानांना चीनविरोधी युद्धात उतरवले जाऊ शकते. नेपाळचे परराष्ट्र धोरण हे अलिप्ततावादाचे आहे. त्यामुळे नेपाळमधील जवान एखाद्या देशाच्या लष्करामध्ये काम करत असतील तर त्यांचा दुसऱ्या देशाविरुद्धच्या लढाईत वापर करणे योग्य नाही, असे नेत्रा बिक्रम चंद याने म्हटले आहे.
गोरखा सैनिकांचे लष्करात वेगळे महत्त्व आहे. भारतातही गोरखा जवान डोंगरदऱ्याच्या भागात तैनात आहेत. भारतातील अनेक शहरांमध्ये गोरखा रेजिमेंट सेंटर्स आहेत. चार प्रमुख शहरांमध्ये ही प्रशिक्षण केंद्रे आहेत. यात सुबातू, शिलाँग, वाराणसी, लखनौ, हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोरखा सैनिकांच्या ३९ बटालियनमध्ये ३२,००० सैनिक आहेत. गोरखा रेजिमेंट सहसा डोंगराळ भागात लढण्यात तज्ज्ञ मानले जाते. गोरखपूरमध्ये गोरखा रेजिमेंटच्या भरतीसाठी एक प्रमुख केंद्र आहे.









