वेदांता-सेसा गोवा लिमिटेड कंपनीतर्फे मदत
प्रतिनिधी / पणजी
गोमेकॉत सुपर स्पेशालिटीत 100 बेड्सचे उद्घाटन करुन कोरोनाच्या तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने सज्जता केली असून पुरेशी पावले उचलली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. बांबोळी येथील गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी विभागात 100 नव्या बेडस्चे उद्घाटन केल्यानंतर डॉ. सावंत बोलत होते.
वेदांता-सेसा गोवा लिमिटेड कंपनीने या 100 खाटा गोमेकॉला पुरवल्या असून त्या सर्व अत्याधुनिक साधनसुविधांनी सुसज्ज आहेत. कोरोना विरोधी लढय़ात अनेक बडय़ा उद्योगांनी गोव्यासह देशभरात मदत केली असून ती सर्वांसाठी लाभदायक ठरली आहे. त्यांची ही मदत कौतुकास्पद आहे.
वेदांताकडून रोज तीन टन ऑक्सिजन पुरवठा
वेदांता ही त्यातील गोव्यातील एक कंपनी असून त्या कंपनीते रु. 10 कोटी खर्च केले आहेत. त्याशिवाय दररोज वेदांतातर्फे 3 टन ऑक्सिजन (लिक्विड) पुरवठा केला जातो. कोरोनाची तिसरी लाट येत्याचा धोका असल्याने तो ओळखून सरकारने ‘टास्क फोर्स’ व ‘राज्य कार्यकारी समिती’ ची स्थापना केली असून त्यांचे काम चालू आहे असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
लहान मुलांवरील उपचारांसाठी सरकारकडून सज्जता
आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले की आता तिसऱया कोरोना लाटेची चर्चा असून त्याचा धोका ओळखून लहान मुलांवर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी विभागात तयारी ठेवण्यात आली आहे. सरकार प्रतिदिन कोरोनाचा आढावा घेत असून कोरोना बाधितांवर योग्य ते उपचार करण्यात येत असल्याचा दावा राणे यांनी केला.
वेदांताने खाटांसोबत 10 व्हेंटीलेटर्स, जंबो ऑक्सिजन सिलिंडर्स, मॉनिटर्स, एक्सरे मशीन, डिफीब्रिलेटर्स यांचाही पुरवठा केला आहे. वेदांताचे सीईओ सौविक मुजूमदार यांच्याहस्ते बेडस डॉ. सावंत यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आल्या. त्यात 20 आयसीयू बेडस्चा समावेश आहे. वेदांताकडून लसीकरण मोहिम देखील राबवली जात असल्याची माहिती मुजूमदार यांनी दिली. त्यावेळी आमदार आंतोनियो फर्नांडिस, फ्रान्सिस सिल्वेरा, गोमेकॉचे डिन डॉ. बांदेकर व इतर उपस्थित होते.









