विभाग पूर्णपणे भरला : गुरुवारी रात्री आलेल्या रुग्णास घेण्यास नकार
प्रतिनिधी /पणजी
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात म्युकर मायकॉसिस ब्लॅक फंगसच्या रुग्णात भरमसाठ वाढ झाली असून या रुग्णांची हेळसांड होत असल्याचे दिसून आले. या रुग्णांवर आता उपचार नाही असे सांगून त्यांना इस्पितळात भरती करण्यासही नकार दिला जात आहे.
म्युकर मायकॉसिसमुळे डोळ्य़ांची दृष्टी गमावलेल्या रुग्णाला गोमेकॉच्या 102 प्रभागामध्ये उपचार चालू होते. चतुर्थीपूर्वी दोन दिवस त्याला घरी पाठवण्यात आले. या रुग्णाची तब्येत बिघडली. इन्फेक्शन कानात आणि डोळ्य़ात पोहोचल्याने त्याला गुरुवार दि. 30 सप्टेंबर रोजी सायं. 5 वा. गोमेकॉत आपत्कालीन विभागात आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तातडीने स्कॅनिंग, एक्सरे काढला व ईएनटी डॉक्टरांना पाचारण केले तरी रात्री 10 पर्यंत डॉक्टर कॅज्युअल्टीमध्ये आले नाही. शेवटी स्ट्रेचरवरुन त्या रुग्णाला 102 प्रभागात पाठवण्यात आले.
या ठिकाणी थेट रुग्णाला आणलाच कसा असे सांगून तेथील डॉक्टरांनी वाद घालण्यास सुरुवात केली. म्युकर मायकॉसिसचा 102 प्रभाग पूर्ण भरला असून या ठिकाणी जागा नाही असे सांगून परत कॅज्युल्टीला पाठवण्यात आले. तेथील मेडिसीन डॉक्टरने तपासणी करुन रुग्ण बरा आहे, त्याला घरी घेऊन चला व दुसऱया दिवशी ओपीडीला आणा असे सूचवले.
रुग्णाची तब्येत बिघडली असताना त्याला दाखल करुन घेतले जात नसल्यामुळे कॅज्युअल्टी विभागात रात्री बराच हंगामा झाला. म्युकर मायकॉसिस वर उपाचार नाही. त्याला इस्पितळमध्ये ठेवून काहीच उपयोग नाही, त्याला घरीच न्या असा सल्ला एका डॉक्टरांनी दिला. जुनाट कळमलेले ऑक्सिजन सिलिंडर वापरल्यामुळे म्युकर मायकॉसिसचे रुग्ण वाढले आहेत. या ऑक्सिजन पुरवठा करणाऱयावर कोणी आवाज उठवत नाही व इस्पितळात दाखल करुन न घेतल्यास डॉक्टरवर नाराज का होता? असा प्रश्न त्यांनी केला.
हा प्रकार रात्री 2 वाजेपर्यंत चालला. आता घरी जाण्याची सुविधा नाही. रात्रभर कॅज्युअल्टीमध्येच थांबून दुसऱया दिवशी ईएनटी ओपीडीकडे जातो असे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले तरी डॉक्टर तयार होईना. तेवढय़ात रुग्णाची तब्येत आणखीनच बिघडली. त्यामुळे न्युरोलॉजी विभागाच्या डॉक्टरला बोलाविण्यात आले. या डॉक्टरांनी पहाटे 3.30 वा. न्युरोलॉजी 139 प्रभागात रुग्णाला दाखल केले.
शुक्रवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. या विभागातील डॉक्टर तपासणीस आले. त्यावेळी त्यांनी हा रुग्ण या प्रभागात का असा प्रश्न करुन बराच हंगामा केला व रुग्णाला घरी जाण्यास सांगितले. अशा परिस्थितीत त्या रुग्णाला घरी कसे घेऊन जायचे असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांना पडला आहे.
म्युकर मायकॉसिसचा प्रभाग पूर्णपणे भरला असून तेथे रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णांना इस्पितळात दाखल करुन घेण्यास नकार दिला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डिन. शिवानंद बांदेकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी फोन घेतला नाही. आरोग्यमंत्र्यांनी किमान या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.