डिचोली व सत्तरीलाचा संधी : डॉ.केतन भाटीकर यांचा आरोप
प्रतिनिधी / फोंडा
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या दंतचिकित्सा विभागात 37 परिचारिकांच्या जागा अवैद मार्गाने भरण्यात आल्या असून त्यात घोटाळा झाल्याचा आरोप मगो पक्षाचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर यांनी केला आहे. नोकर भरतीमध्ये केवळ डिचोली व सत्तरी तालुक्यातील उमेदवारांनाच संधी देऊन फोंडय़ासह इतर तालुक्यातील सुशिक्षित उमेदवारांवर सरकारने अन्याय केला आहे. सरकारने या परीक्षेचा निकाल जाहीर करुन त्यासंबंधी खुलासा करण्याची मागणीही डॉ. भाटीकर यांनी केली आहे.
नर्सिंग परीक्षेचा निकाल येण्यापूर्वीच परस्पर ही पदे भरण्यात आली आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे या 37 पदापैकी 17 उमेदवार एकाच सत्तरी तालुक्यातील आहेत. शिवाय उर्वरीत 90 टक्के उमेदवार हे डिचोली तालुक्यातील आहेत, असा आरोपही त्यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला. या परीक्षेसाठी राज्यातील विविध भागातून किती उमेदवारांनी परीक्षा दिली होती व त्यात केवळ सत्तरी आणि डिचोली तालुक्यातील सर्व उमेदवार कसे पात्र ठरले हे भाजपा सरकारने जाहीररित्या सांगावे, अशी मागणीही डॉ. भाटीकर यांनी केली. या उमेदवारांची नियुक्ती कुणी व कुठल्या तत्त्वावर केली हे जनतेला कळणे गरजेचे आहे. बीएससी नर्सिंग होऊन गोमेकॉत गेली 18 ते 20 वर्षे काम करणाऱया परिचारिकांना अद्याप सेवेत कायम केलेले नाही. त्यांचा विचार न करताच ही थेट नोकर भरती करून या परिचारीकांवरही अन्याय सरकारने अन्याय केला आहे, असे भाटीकर म्हणाले. निवडणुकीच्यावेळी भाजपाचे नेते जनतेला पाच हजार नोकऱयांची आश्वासने देऊ प्रत्यक्षात आपापल्या मतदारसंघातून मागील दाराने कशी नोकर भरती करतात हे याचे ताजे उदाहरण आहे. गोव्यातील सुशिक्षित बेरोजगारांची हे सरकार फसवणूक करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी मगो पक्षाचे सुमित वेरेकर व सर्वेश शिरोडकर हे उपस्थित होते.









