पणजी / प्रतिनिधी
कोविड -19 या साथीच्या आजारामुळे जगातील वेगवेगळय़ा भागातील क्रूझ लाइनर / जहाजावर अडकलेल्या विविध गोमंतकीयांना बरीच समस्या व त्रास सहन करावा लागत आहे. त्यापैकी बहुतेकांना त्यांच्या कंपन्यांनी सोडून दिले आहे आणि त्यांना भारतात परत येण्याची तातडीची गरज आहे. यामुळे त्यांचे कुटुंबीय प्रचंड ताणतणावात असून त्यांच्या आरोग्याबद्दल काळजीत आहेत.
उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये या विषयाचा उल्लेख केला आहे. तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला यासंबंधीचे पत्रही पाठविले आहे. केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले, की आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहोत आणि लवकरात लवकर आमच्या गोमंतकीय खलाशांना परत आणण्याचा प्रयत्न करीत आहोत.









