वार्ताहर / झुआरीनगर
गोमंतकीय खलाशी युरोप, अमेरिका तसेच इतर विविध देशात जहाजांवर काम करीत आहेत. अशा किमान आठ हजार खलाशांना परत गोव्यात आणण्यासाठी त्वरित पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
अमेरिका तसेच युरोपात कोरोना विषाणूबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गोमंतकीय खलाशांची कुटुंबे भयभीत झालेली आहे. आपल्या कुठ्ठाळी मतदारसंघातील अनेकजण जहाजांवर काम करीत आहेत. या खलाशांच्या कुटुंबांची झोपच उडालेली आहे. या खलाशांना परत गोव्यात आणण्यासाठी ते वारंवार आपल्याशी संपर्क साधत असल्याचे आमदार एलिना साल्ढाणा यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या समस्येविषयी नक्कीच पावले उचलणार व या खलाशांना गोव्यात परत आणतील. याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांनी चर्चा केलेली आहे. याविषयी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून लवकरात लवकर हे खलाशी गोव्यात येतील, असा विश्वास आपल्याला आहे, असे आमदार साल्ढाना यांनी म्हटले आहे.









