गोवा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार यांच्याकडे विनंती
प्रतिनिधी / पणजी
मुंबईतील क्रूज बोटीवर अडकून पडलेल्या गोव्यातील 93 खलाशांची सुटका करून त्यांना गोव्यात आणावे यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मदत करावी अशी मागणी करणारे पत्र गोवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी पाठविले आहे. या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्यावतीने प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे.
मुंबईत नांगरून ठेवलेल्या कर्णिका या बोटीवर गोव्यातील 93 खलाशी अडकून पडले आहेत. यापैकी 66 खलाशी हे दक्षिण गोव्यातील आहेत. पैकी 8 जण राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमांव यांच्या मतदारसंघातील आहेत, तर 7 जण वास्को मतदारसंघातील आहेत. ही बोट येऊन बरेच दिवस उलटले. 14 दिवसांचा कालावधी 26 मार्च रोजी संपुष्टात आला. या खलाशांचे कुटुंबीय चिंतेत आहेत व त्यांना गोव्यात आणण्यासाठी ते वारंवार विनंती करत आहेत. त्याचबरोबर मारियाला डिस्कवरी या बोटीवरही गोव्यातील खलाशी आहेत. ही बोट 14 एप्रिल रोजी दाखल झाली आहे. त्यामुळे त्या दोन्ही बोटीवर असलेल्या गोव्यातील खलाशांना गोव्यात आणण्यासाठी मदत केली जावी अशी मागणी जुझे फिलीप डिसोझा यांनी पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
हा विषय डी. जी. शिपिंग व महाराष्ट्र सरकारकडे मांडून या खलाशांची सुटका करावी व त्यांना गोव्यात आणण्यास मदत करावी अशीही मागणी या पत्रात केली होती. गोव्यातील खलाशांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे.









