गोवा विद्यापीठाचे प्रा. विनय मडगावकर यांचे मत : वसंत व्याख्यानमाला-आरसीयूच्या मराठी अध्ययन-संशोधन केंद्रातर्फे ‘गोमंतक : संस्कृती आणि साहित्य’ राष्ट्रीय चर्चासत्र
प्रतिनिधी /बेळगाव
पोर्तुगीजांनी गोव्यातील साहित्य-संस्कृतीवर अतिक्रमण करीत आपले अस्तित्व प्रस्थापित करण्याचा जिकिरीचा प्रयत्न केला. मात्र, गोमंतकीयांनी साहित्य-संस्कृती संवर्धन करत निकराचा लढा देऊन आपली संस्कृती जिवंत ठेवली, असे मत गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. विनय मडगावकर यांनी व्यक्त केले.
वसंत व्याख्यानमालेच्यावतीने व राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे ‘गोमंतक ः संस्कृती आणि साहित्य’ हे राष्ट्रीय चर्चासत्र बुधवारी सरस्वती वाचनालय येथे पार पडले. त्यावेळी गोमंतकीय संस्कृती या विषयावर ते बोलत होते.
ते म्हणाले, गोव्यातील मंदिरे ही सांस्कृतिक अभ्यासाची केंदे आहेत. 1510 नंतर पोर्तुगीजांच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा प्रभाव गोव्यावर पडला, हे नाकारता येत नसले तरी शिमगोत्सवासारख्या महत्त्वाच्या उत्सवाला पोर्तुगीज उस्त्रtस उत्सवाचे स्वरुप देत ही परंपरा जपली गेली. गणेशचतुर्थीत वाजणारे पारंपरिक घुमट वाद्य, म्हादोळ वाद्य, सांचेव महोत्सव, चोरांचा रोमाट यातून संस्कृतीची जपणूक झाली. विविध सण-उत्सवांची नावे बदलून त्यांचे जतन केले. ‘दांडग्या’, ‘होयनामेळी’, ‘भालू’, फुगडी, समईनृत्य, घोडेमोडणी अशा नृत्यांच्या माध्यमातून गोमंतकीय सालंकृत संस्कृतीचे जतन केले गेले, असे त्यांनी नमूद केले.
माझा महाराष्ट्रातील अनेकांशी स्नेह जुळला-कुलगुरु डॉ. रामचंद्रगौडा
चर्चासत्राचे उद्घाटन केल्यानंतर कुलगुरु डॉ. रामचंद्रगौडा यांनी बेळगावमध्ये मराठी आणि कन्नड संस्कृती नांदते. येथील खाद्यसंस्कृती गोव्याशी मिळतीजुळती आहे. कन्नड भाषिक असूनही माझा महाराष्ट्रातील अनेकांशी स्नेह जुळला, तो केवळ मराठीच्या प्रेमापोटीच, असे सांगितले.
प्रारंभी सुनीता देशपांडे, अर्चना बेळगुंदी, विद्या देशपांडे व कमल कुलकर्णी यांनी ईशस्तवन सादर केले. तसेच चर्चासत्राला अनुरुप ‘वल्हव रे नाखवा’ व ‘माझे राणी माझे मोगा’ ही दोन गीते सादर केली. त्यांना सारंग कुलकर्णी यांनी संवादिनीची व सावन लाड यांनी तबल्याची साथ दिली. वसंत व्याख्यानमालेच्या अध्यक्षा प्रा. मीना खानोलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. स्वरुपा इनामदार यांनी चर्चासत्राचा हेतू स्पष्ट केला. आरसीयूच्या मराठी विभागातर्फे प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले. माधुरी शानभाग, प्रियांका केळकर व दीपा देशपांडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. या सत्राचा समारोप प्रा. चंद्रकांत वाघमारे यांनी केला.
बेळगावने महत्प्रयासाने मराठीचा नंदादीप तेवत ठेवला- परेश प्रभू
बेळगावने महत्प्रयासाने मराठीचा नंदादीप तेवत ठेवला आहे. कृष्णराज शामा यांनी श्रीकृष्ण गाथा ग्रंथ लिहून गोव्यामध्ये मराठी आणि साहित्य संस्कृतीला न्याय दिला. परंतु, गोवा आणि बेळगावच्या या कार्याची दखल महाराष्ट्राने घेतली नाही, अशी खंत नवप्रभाचे संपादक परेश प्रभू यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, गोव्यावर 451 वर्षे पोर्तुगीजांची सत्ता होती. परंतु, 1910 पासून गोव्यातील परिवर्तनाला सुरुवात झाली. गोव्यात लिहिलेल्या ‘शाकुंतल’चा प्रयोग बेळगावात झाला व बेळगाव-गोव्याचे नाते अतूट असल्याचे सांगून बेळगावचा गोवामुक्ती लढय़ातील सहभाग गोमंतकीय कधीच विसरणार नाहीत, असे ते म्हणाले.
1910 पासून गोव्यात परिवर्तनाला सुरुवात झाली व हिंदू धर्मियांची मोठय़ा प्रमाणात निंदानालस्ती झाली. पण साहित्य व संस्कृती रक्षणामध्ये गोमंतकीयांनी कोणाचीच गय केली नाही, असेही त्यांनी नमूद केले.
पण महाराष्ट्राने दखल घेतली नाही -प्रा. डॉ. विनोद गायकवाड
तिसऱया सत्रामध्ये प्रश्नोत्तरानंतर प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांनी अध्यक्षीय समारोप करताना गोव्याचा उल्लेख केवळ सुंदर कविता असाच करावा लागेल. गोमंतकाने अनेक साहित्यिक दिले. पण महाराष्ट्राने त्यांची दखल घेतली नाही, अशी खंत व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. मनीषा नेसरकर यांनी केले. डॉ. मैजोद्दिन मुतवल्ली यांनी आभार मानले.









