बडोदा / वृत्तसंस्था
गुजरात राज्यातील गोध्रा येथे 2002 मध्ये झालेल्या रेल्वे जळीतकांडातील एका आरोपीला तब्बल 19 वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव राफिक भटुक असे आहे. या जळीत कांडात अयोध्येतील रामजन्मभूमीत करसेवा करून परतणाऱया 69 हिंदूंचा बळी घेण्यात आला होता. या कटकारस्थान सहभागी असणाऱया अनेकांना शिक्षा देण्यात आली आहे. भटुक हा हे जळीतकांड घडल्यानंतर अनेक वर्षे राज्याबाहेर लपलेला होता.
आता अटक होण्याचा धोका टळलेला आहे असे समजून तो काही दिवसांपूर्वी गोध्रा येथे परतला होता. पोलिसांना त्यांच्या खबऱयांकडून सूचना मिळताच त्याला त्याच्या निवासस्थानातून मंगळवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर कट रचणे, कट साकारण्यासाठी साधनसामग्री पुरविणे आणि विविध समाजघटकांमध्ये तेढ निर्माण करणे आदी आरोप ठेवण्यात आले असून तो पोलिसांना हवा होता. या जळीतकांडाती आणखी 3 मुख्य आरोपी आजही बेपत्ता असून दोघांची नावे सलीम पानवाला आणि शौकत चरखा अशी असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत.









