27 तलावांतील 992.52 हेक्टर जलक्षेत्रात होणार मत्स्यपालन : मत्स्य विभागाला मिळणार 7 लाख 91 हजार रुपयांचा महसूल
महेंद्र पराडकर / मालवण:
तलाव किंवा गोडय़ा पाण्याच्या जलाशयांमध्ये केल्या जाणाऱया मत्स्यपालनाच्या दृष्टीने जिल्हय़ात चांगले संकेत प्राप्त होत आहेत. जिल्हा मत्स्य विभागाच्या अखत्यारित येणाऱया सर्वच्या सर्व 27 तलावांमध्ये यंदा प्रथमच ठेकेदारी पद्धतीने मत्स्यबीज संवर्धन आणि मत्स्यपालन होणार आहे. यात प्रामुख्याने रोहू, कटला, मृगळ आणि गवत्या या माशांचे उत्पादन घेतले जाणार आहे. गोडय़ा पाण्यातील मत्स्यपालनासंदर्भात शासनाकडून होत असलेली प्रभावी जनजागृती तसेच अशा प्रकारची मासेमारी करणाऱया मच्छीमारांचे सकारात्मक अनुभव यामुळे जिल्हय़ातील तलाव क्षेत्रामध्ये मत्स्यपालनास प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे.
शून्य ते 500 हेक्टर जलक्षेत्र असलेले तलाव किंवा जलाशय हे जिल्हा मत्स्य विभागाच्या अखत्यारित येतात. 2015-16 या कालावधीत यापैकी 23 तलाव ठेकेदारी पद्धतीने देण्यात आले होते. 2016-17 मध्ये त्यात घट पाहायला मिळाली. या वर्षात 18 तलाव ठेकेदारी पद्धतीने दिले गेले. 2017-18 मध्येही ही घट कायम राहिली. या वर्षात 16, तर 2018-19 मध्ये फक्त 9 तलाव ठेकेदारी पद्धतीने मत्स्यपालनासाठी दिले गेले. 2019-20 मध्ये केवळ 6 तलाव मत्स्यपालनासाठी कार्यरत होते. मात्र, यंदा 2020-21 मध्ये त्यात साडेचार पटीने वाढ होऊन 27 ही तलावांमध्ये जिल्हा आणि जिल्हय़ाबाहेरील ठेकेदारांनी आर्थिक गुंतवणूक करून गोडय़ा पाण्यातील मासेमारी उद्योगाला चालना दिली आहे. या 27 तलावांच्या माध्यमातून 992.95 हेक्टर जलक्षेत्र गोडय़ा पाण्यातील मासेमारीखाली आले आहे. या मत्स्यशेती त्नालाव ठेका पद्धतीतून मत्स्य विभागाला एकूण 7 लाख 91 हजार 19 रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.
22 तलावांच्या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद
2020-21 या आर्थिक वर्षात सुरुवातीला जिल्हय़ातील चोरगेवाडी, धामापूर, दाभाचीवाडी, ओटव आणि देंदोनवाडी या पाच मत्स्यशेती प्रकल्पांमध्ये ठेकेदारी पद्धतीने मत्स्यपालन सुरू झाले होते. 2020-21 ते 2024-25 या कालावधीसाठी नव्याने केलेल्या ओसरगाव, तळेवाडी, निळेली, आंबोली, कारिवडे, कोकीसरे, तिथवली, नानिवडे, नाधवडे, माडखोल, शिवडाव, ओझरम, हरकुळ, लोरे, देवघर, हातेरी, ओरोस, पावशी, सनमटेंब, शिरवल, आडेली, शिरगाव या 22 तलावांच्या निविदा प्रक्रियेस जिल्हा आणि जिल्हय़ाबाहेरील मत्स्य शेतकऱयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सकारात्मक वातावरणाचे फलित
सिंधुदुर्ग हा सागरी जिल्हा असल्याने जिल्हय़ात सागरी मासे खाण्याचे प्रमाण जास्त आहे. गोडय़ा पाण्यातील मासे तेवढय़ा चवीने येथे खाल्ले जात नाहीत. किंबहुना सागरी माशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. जिल्हय़ात होणाऱया मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे बऱयाचदा तलाव पूर्णत: भरून वाहू ल<ागतात. स्थानिक बाजारात गोडय़ा पाण्यातील माशांना योग्य भाव मिळत नाही. तसेच मत्स्यबिजाची समस्या भेडसावते. अशा कारणांमुळे गोडय़ा पाण्यातील मासेमारीकडे विशेष लक्ष दिले जात नव्हते. गोडय़ा पाण्यातील मत्स्यपालन म्हणजे घाटय़ाचा सौदा म्हणूनच पाहिले जात होते. परंतु गेल्या दोन वर्षात गोडय़ा पाण्यातील मत्स्योत्पादनासाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱया विविध योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी मत्स्य विभागाकडून घेतली जाणारी सकारात्मक मेहनत यामुळे गोडय़ा पाण्यातील मत्स्योद्योगाला चालना मिळत असल्याचे दिसून येते.
कोल्हापूर, गोव्यात चांगली बाजारपेठ
गोडय़ा पाण्यातील माशांना कोल्हापूर व गोवा येथे चांगली बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे सांगितले जाते. तसेच बाळासाहेब कोकण विद्यापीठांतर्गत मुळदे येथील मत्स्यबीज केंद्राकडून मत्स्यबीजही जिल्हय़ात उपलब्ध होते. मत्स्य विभागाचे सातारा जिल्हय़ातील धोंड येथे मत्स्य बीज केंद्र आहे. तेथूनही मत्स्य विभागाकडून मत्स्यबीज उपलब्ध करून दिले जाते. अशा पद्धतीचे पोषक वातावरण या व्यवसायासाठी उपलब्ध होत असल्याने गोडय़ा पाण्यातील मत्स्यपालन फायदेशीर व्यवसाय ठरू शकते, अशी मानसिकता आता तयार झाली आहे. त्यामुळेच यावर्षी जिल्हा मत्स्य विभागाच्या अखत्यारितील सर्वच्या सर्व 27 तलावांना मत्स्यशेतीसाठी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.