सिद्धस्वर किंवा स्वरसिद्ध गायक पं. वसंतराव देशपांडे यांनी एक उद्गार गाण्याविषयी काढले होते. ते म्हणाले होते की सुरांना रागलोभ काहीही नसते. असते ती फक्त आर्तता! एखाद्या चिकित्सक वृत्तीच्या व्यक्तीला प्रश्न पडेल की सुरांच्या साहाय्याने केवळ रागलोभच नव्हे तर संपूर्ण भावना कल्लोळ मांडता येऊ शकतो तरीही हे असे का म्हणाले असतील? तर आर्तता ही भावनांच्या तीव्रतेनुसारच कमी जास्त होत असते. त्यामुळे प्रत्येक स्वराला जशी विशिष्ट कंपने असतात, त्याचप्रमाणे आर्ततेचे हे गणित त्यांना अभिप्रेत असावे की काय ते कोण जाणे! आपल्याला मात्र आर्तता म्हटले की विरहगीते आठवतात. मनुष्यप्राण्याचा स्वभावच मोठा विलक्षण आहे. त्याला मिळालेल्या गोष्टींपेक्षा न मिळालेल्या गोष्टींविषयीच जास्त आकर्षण असते. त्याचीच हुरहूर जास्त असते. आणि अशा भावनेची मांडणी साहजिकच आर्तता, कातरता सोबत घेऊन येते. त्यामुळे अशा गाण्यांच्या चाली एकतर करुणरसप्रधान असतात किंवा तशा रागांवर आधारित असतात. आणि दुसरा विषय म्हणजे अशा गाण्याचे शब्द फार नेमके अर्थवाही असावे लागतात. आणि तसे ते असतात. आरती प्रभूंच्या कवितेसारखी अतिदुर्बोध कविता तितक्मयाच यथायोग्य संगीताचा साज लेवून येते तेव्हा भले कळत नसेल तरीही ती पुनः पुन्हा ऐकावीशी वाटते आणि ऐकता ऐकता तिचा खोलवर दडलेला गूढार्थ समजत जातो. चंदन उगाळता उगाळता घमघमाट वाढत जावा अगदी तसाच! टोकाच्या म्हणाव्या अशा मंद्र आणि तारस्वरांना अतिशय वेगळय़ा प्रकारे वापरून एक अद्वितीय चाल केली आहे पं. हृदयनाथांनी! ती गायिलीही आहे आशाताईंच्या चमत्कारी आवाजाने! सगळीच सोनशिखरे! कुणाला नावाजायचे? आणि कुणी असा प्रश्न पडतो. आरती प्रभूंच्या कविता म्हणजे अक्षरशः आव्हान! वाचणाऱयाला आणि संगीत देणाऱयाला! आकाशातील अचल नक्षत्रे कुठे आणि एका दिवसात फुलून कोमेजून जाणाऱया कळय़ा, एका दिवसात पाचोळा होऊन वाऱयावर जाणारी पाने कुठे? म्हणजे जे करायचे होते ते आणि जे हातात राहिले ते यांच्यातली तफावत केवढी प्रचंड आहे! पार करता येणे केवळ अशक्मय! कडव्यात कवी म्हणतो आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त, दिवसांचे ओझे अता, रात्र रात्र सोशी ।़।़ रक्त यातली ‘सोशी’ या शब्दावरची जागा आशाताईंनी अशी घेतली आहे ना की काळजावर सुरी फिरत जाते. आणि त्या रात्रीची वेदना कळते. पहिल्या ओळीपासून दुसरी संपेपर्यंत सरळ अवरोही गंमत आणि तिसऱया ओळीत एकाएकी उचलून धरल्यासारखी (आ)रोहिणी रचना! कमालच! दुसरे कडवे तर एकदम हेलावून सोडणाऱया उंच पल्लेदार स्वरात सुरू होऊन सर्रदिशी कोसळत खाली येते तेव्हाची मनोवस्था अवर्णनीय असते. सारांश अपूर्णता समग्रतेने कळते.
‘अपुरे माझे स्वप्न राहिले’ हे शब्द वाचल्यावर नक्की वाटेल की हेही एक असे गाणे आहे ज्यात अपुरेपणाचे दु:ख भरलेले असेल. पण ही मोठी गंमत आहे हा! आपली विकेट जाते ती इथेच! हे स्वप्न अपुरे आहेच. त्याचे तिला वाईट वाटतेच. पण हे नुसते वाईट वाटणे नाहीच. ती एक लाडिक तक्रार आहे, जी वाचल्यावर ‘उषा अनिरुद्ध’ मधल्या उषास्वप्नाची आठवण होईल. प्रेमाच्या क्षणात राहून गेलेल्या अपुरेपणाचे दु:खही फार तीव्र आणि कौतुकही फार! मला अजून बोलायचे होते पण डोळे फितूर झाले म्हणणारी ही नवप्रेमिका स्वरबद्ध आहे ती आशाताईंच्याच शब्दात! गाण्याला असणारा खास घरंदाज टच ही पी.सावळाराम यांची खासियत, तर तोच स्वरसोज्ज्वळपणा ही वसंत प्रभू यांची किमया. या अपूर्णतेच्या गोडव्याचे जेव्हा वेडच लागते, म्हणण्यापेक्षा जेव्हा त्या अपूर्णतेची खरी किंमत कळते तेव्हा आयुष्यात काही अपूर्ण राहावे असे वाटते. मग म. पां. भाव्यांचे शब्द आशाताईंच्या स्वरात विनवतात स्वप्नातल्या कळय़ांनो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील जीवा या गाण्याचा उत्कर्ष बिंदू आहे तो शेवटच्या ओळीत. ती आहे, काटय़ाविना न हाती केव्हा गुलाब यावा अगदी खरे आहे. दु:ख सोसल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही पण काहीवेळा संकोच नडतो आणि मिळू घातलेले सुखाचे क्षण हातातून निसटून जातात. वसंतराव देशपांडे यांनी गायिलेलं राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे हे गाणे या अशा भावनांचा अप्रतिम बहर आहे. वा.रा.कांत यांचे हे गाणे, त्यातले शब्द अर्थाच्या दृष्टीने कठीण आहेतच पण श्रीनिवास खळे उपाख्य खळेकाका यांनी दिलेले संगीत म्हणजे अक्षरशः शिवधनुष्य आहे. त्यामुळे स्वरवसंतालाच हे पेलावे. निसटलेला संधीचा क्षण किती नुकसान करतो यावर अतीव गोड स्वरभाष्य करणारे कुमारजींनी गायिलेलं कवी अनिल यांचे आज अचानक गाठ पडे हे गीत. भलत्या वेळी भलत्या मेळी पडलेली गाठ पडते तीही मन भलतीचकडे असताना! अतिशय सरळ साध्या सरळ रोजच्या वापरातील शब्दांची अशी बोलकी रचना करायची म्हणजे माणूस काय दर्जाचा कलाकार हवा! नमस्कार या लोकांना. कुमारजींनीच हे गीत भीमपलासात स्वरबद्ध केले आहे. अस्सल मालवी पलाश के फूल आहेत हे.
प्रेमभंग होऊन स्वप्न अपुरे राहणे हे दु:ख खरेच दारुण असते. शत्रूच्या वाटणीलाही असे दु:ख येऊ नये म्हणताना अतिशय जिवलग व्यक्तीवर ती वेळ आलेली बघावी लागते तेव्हा बघणारा माणूस सहजच उद्गारतो, भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी घडल्यापासून ते आजच्या घडीपर्यंत अत्यंत लोकप्रिय असलेले हे गाणे भावगीताचे बादशहा असलेल्या अरुण दाते यांनी गायिले आहे. वृंदावनी सारंग या सदाप्रिय रागातले हे गाणे कवी मंगेश पाडगावकर यांचे. याचे म्युझिक पीसेस तर अक्षरशः बेचैन करून सोडतात. आजची भेट ही शेवटची आहे. उद्या पहाटेपासून वाटा वेगवेगळय़ा आहेत हे जाणून भेटणारे दुर्दैवी प्रेमिक ते त्यांच्या ताटातुटीचे वर्णन फार फार रडवते. वाऱयावर विरून जाणारी ही विराणी बघवत नाही. अशीच बाबूजींची अस्वस्थ गाणी आहेत डोळय़ांमधले आसू पुसती ओठावरले गाणे आणि त्या तरुतळी विसरले गीत दोन्ही जुनी आहेत. कवी, संगीतकार सिद्धहस्त आहेत. पण ती ऐकताना डोळे पाणावले नाहीत असा श्रोता दुर्मिळ! एकतर बाबूजींचा स्वर आणि उच्चार म्हणजे सर्वोच्च भावविभोर. त्यात अपुरेपणाचे आणि भग्न हृदयाचे रुदन! काय काय म्हणून अनुभवावे?
तशी अपुरेपणा वर्णन करणारी, विरह, अपयश यावर लिहिलेली गाणी असंख्य आहेत, पण प्रत्येकाच्या रुचीप्रमाणे येताजाता आठवत राहतात. अचानक समोर येतात, कधी छळतात तर कधी जळतात. कधी पिंगा घालतात तर कधी वेडे करतात. कारण एकच आहे. जे मिळाले नाही त्याभोवती मन फिरते. सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे, जे सुदूर जे असाध्य तेथे मन धावे हाच सृष्टीक्रम आहे.
अपर्णा परांजपे-प्रभ








