वार्ताहर / पुलाची शिरोली
संदीप सदाशिव खरोसे ( वय ३३, रा. नरसिंह कॉलनी, प्लॉट नंबर ३, फुलेवाडी, कोल्हापूर ) असे मृताचे नाव आहे. ही घटना नागाव ता. हातकणंगले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील फिरोज कॉलनीत असणार्या गोल्डन ट्रेडर / मोमीन ग्लास अॅण्ड प्लायवूड येथे मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता घडली. विशेष म्हणजे सकाळी घडलेली ही घटना गोडावून व्यवस्थापनाने लपविण्याचा प्रयत्न केला होता. पण खरोसे कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने सायंकाळी साडेचारच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संदिप खरोसे हे आपली टाटा इंट्रा ( एमएच ०९ एफएल २४६३ ) ही मालवाहू रीक्षा घेऊन गोल्डन ट्रेडर / मोमीन ग्लास अॅण्ड प्लायवूड या गोदामातून काचा भरुन जाणार होते. काचा भरत असताना क्रेनचा बेल्ट तुटून काचा निसटल्या. त्याच्या मध्यभागी संदिप खरोसे उभे होते. काच अंगावर पडून फुटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गोदाम व्यवस्थापनाने दुसऱ्या मालवाहू रिक्षातून संदिपचा मृतदेह कोल्हापूर येथील दवाखान्यात नेला. दरम्यान या घटनेची माहिती संदिपच्या घरच्यांना मिळाली.
ते घटनास्थळी आले त्यावेळी गोडाऊन बंद होते. त्यानंतर त्यांनी दवाखान्यात धाव घेतली. या दुर्घटनेची कायदेशीर चौकशी व्हावी. अशी मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिरोली एमआयडीसी पोलीसांना बोलाविण्यात आले. स. पो. नि. राजेश खांडवे पुढील तपास करत आहेत. संदीप खरोसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.
पंधरा दिवसांपूर्वी सनद माळावरील पाण्याच्या टाकी जवळ माल वाहतूक गाडीने लहान चिमूरडीला चिरडून मारले होते. ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच पद्धतीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. पण शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी उघडकीस आणले.









