तरुण भारतच्या वृत्ताची घेतली दखल
प्रतिनिधी / बेळगाव
गोगटे सर्कल येथे स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात येणाऱया रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत होते. त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या खडीमध्ये वाहने अडकत असल्याचे वृत्त तरुण भारतने सोमवारी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत मंगळवारी सकाळपासून खडी टाकण्यात आलेल्या भागात पेव्हर्स बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
रेल्वे स्टेशन येथून गोगटे सर्कल येथे येणाऱया मार्गावर खडी टाकण्यात आली होती. स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे आधीच त्रस्त असणाऱया नागरिकांना गोगटे सर्कल येथील अर्धवट कामामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. खडीत अडकलेली वाहने ढकलत घेऊन जाण्याची वेळ वाहनचालकांवर आली होती. मोठी वाहने अडकल्याने ती इतर वाहनाने ओढून काढावी लागली. त्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी होत होती. तरुण भारतने या समस्येवर प्रकाश टाकताच स्मार्ट सिटी प्रशासनाकडून दुसऱयाच दिवशी या कामाला सुरुवात करण्यात आली. मंगळवारी हा रस्ता बंद करून त्या ठिकाणी पेव्हर्स बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शहराच्या इतर ठिकाणीही अशी अर्धवट कामे नागरिकांसाठी डोकेदुखीची ठरत असल्याने ती त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.









