औद्योगिक वसाहतीमध्ये भितीचे वातावरण
गोकुळ शिरगाव / प्रतिनिधी
गोकुळ शिरगाव तालुका करवीर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.पॉझिटिव्ह सापडल्याने गोकुळ शिरगाव सरपंच एम के पाटील गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि प्रशांत चव्हाण यांनी गोकुळ शिरगाव गाव तीन दिवसासाठी पूर्ण सील करण्यात येणार असल्याचे सकाळी बैठक घेऊन सांगितले.
बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही माहिती गोकुळ शिरगाव गावात समजल्याने संपूर्ण गाव आज भीतीच्या छायेखाली आहे. सापडलेला रुग्ण हा दूध टँकरवर ट्रक चालक असल्याचे समजल्यानंतर जे ट्रकचालक मुंबईला जातात त्या सर्वांची आज ग्रामपंचायत नोंद घेणार असून या सर्वांना मुंबई व पुणे या ठिकाणावरून जे चालक येतात त्यांना गावात प्रवेश न देता बाहेर त्यांची सोय करून ठेवले जाईल. शिवाय ट्रकचालक पुणे- मुंबईसाठी जातात त्यांनी ग्रामपंचायत मध्ये कळवावे असे आव्हान यावेळी करण्यात आले आहे.
बरेच ट्रकचालक हे गोकुळ शिरगाव गावांमध्ये भाड्याने व स्वतः खरेदी केलेल्या घरात राहत आहेत. असे यावेळी बैठकीत सांगण्यात आले. शिवाय तीन दिवस कोणीही एमआयडीसीमध्ये कामाला जाणार नाही याची दक्षता घेणार असल्याचेही या बैठकीत ठरले. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत या ठिकाणी असल्याने कामगार या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात राहत आहेत. आज जे कामगार कामावर गेलेत त्यांनासुद्धा आज ग्रामस्थांनी मागे बोलावले आहे. तर बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कंपनीत आलेल्या कामगारांना घरी पाठवून दिले असल्याचे यावेळी साताप्पा कांबळे यांनी या बैठकीत सांगितले.