प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा दूध संघ निवडणूकीसाठी दाखल झालेल्या 482 उमेदवारी अर्जांपैकी 76 जणांचे 104 अर्ज अवैध ठरले आहेत. यापैकी 35 अवैध अर्जांवरील हरकतीवर सुनावणी पुर्ण झाली असून मंगळवार दि. 6 रोजी सकाळी 11 वाजता निकाल जाहिर करण्यात येणार आहे. दूध पुरवठा, पशुखाद्य खरेदी, अनामत आदी कारणाने यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. मंगळवारपासून माघार असून 20 एप्रिलपर्यंत मुदत आहे.
अवैध अर्जांमध्ये जिल्हा बँकेचे संचालक पी. जी. शिंदे, विनायक पाटील, भारती डोंगळे, के. एस. चौगले, जिल्हा परिषद सदस्य जयवंत शिंपी, माजी सदस्या शैलजा पाटील, सुनिता देसाई, वसंतराव नंदनवडे, यशवंत नांदेकर, वसंत धुरे, अंजना रेडेकर, करवीरचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे व बाजार समितीचे माजी सभापती संभाजी पाटील यांचा समावेश आहे. उमेदवारीच्या स्पर्धेतून हे बाहेर पडले आहेत.
गोकुळ दूध संघाच्या 21 जागांसाठी विक्रमी 482 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी छाननी केली. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील निवडणूक कार्यालयात ही छाननी झाली. यामध्ये सर्वसाधारण गटात 171 जणांनी 276 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी 31 अर्ज अवैध ठरले. परंतू 15 जणांनी यावरती हरकत घेतली. महिला राखीवसाठी 74 महिलांचे शंभर अर्ज दाखल झाले होते. यापैकी 25 अर्ज अवैध ठरविण्यात आले. परंतू 11 महिलांनी हरकत घेतली. विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या एका जागेसाठी 13 जणांचे 19 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी 3 अर्ज अवैध ठरले. या तिघांनीही यावरती हरकत घेतली.
नागरीकांचा मागास प्रवर्गातील एका जागेसाठी 46 जणांचे 67 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज झालेल्या छाननीत 10 अर्ज अवैध ठरले. यापैकी तीघांनी हरकत घेतली. अनुसुचीत जाती प्रवर्गातील एका जागेसाठी 15 जणांनी 20 अर्ज दाखल केले होते. यापैकी 6 अर्ज अवैध ठरले. यामध्ये दोघांनी हरकत घेतली. या सर्वच गटातील 35 हरकतींवर सुनावणी पुर्ण करण्यात आली असून निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. मंगळवारी (दि.6) सकाळी 11 वाजता निर्णय देण्यात येणार आहे.
वकिलांची फौज तयार
उमेदवारी अर्ज छाननीत गेल्याने 76 पैकी 35 जणांनी हरकती घेतल्या. या हरकतदारांनी तात्काळ वकीलांमार्फत म्हणणे सादर केले. छाननीच्या ठिकाणी वकीलांची फौज तयारच होती. उमेदवारी अर्ज अवैध ठरताच वकीलांमार्फत म्हणणे सादर करण्यात आले
पशुखाद्य, दूध पुरवठा निकष महत्वाचा
आजच्या या छाननीमध्ये प्रामुख्याने संबंधीत सभासद संस्थांनी गोकुळ कडून किमान 10 टन पशुखाद्य व वर्षातील 240 दिवसात किमान 42 हजार लिटर दूध पुरवठा होणे आवश्यक होते. या दोन निकषांवरच अनेकांच्या निवडणूकीपुर्वीच दांडÎा उडाल्या असून रिंगणातून बाहेर पडावे लागले आहे.
यांच्या हुकल्या संधी
छाननीमध्ये अनेक दिग्गजांना गोकुळच्या रिंगणाबाहेर पडावे लागले आहे. भारती विजय डोंगळे यांची सत्तारुढ गटाकडून उमेदवारी निश्चित मानजी जात होती. तर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधूकर जांभळे यांनी पत्नी माधुरी जांभळे यांच्या उमेदवारीसाठी विरोधी शाहू आघाडीकडे जोरदार फिल्डींग लावली होती. संभाव्या उमेदवारीचे दावेदार असलेले वसंत धुरे, पी.जी. शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, सुप्रिया साळोखे, जयवंत शिंपी, वसंतराव नंदनवडे, सुशिला भाईटे यांनाही लढाईपुर्वीच माघारी परतावे लागले आहे. अंजना रेडेकर यांचा सर्वसाधारण गटातील अर्ज अवैध ठरला असला तरी महिला राखीव मधील अर्ज वैध ठरला आहे.