आमदार पी एन पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यासोबत झाली बैठक, शाहू आघाडीला धक्का
प्रतिनिधी /कोल्हापूर
जिल्ह्यात गोकुळ निवडणुकीचे वातावरण सध्या चांगलचं तापलेलं चित्र आहे. सत्ताधारी गटाशी फारकत घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीत दाखल झालेले माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर पुन्हा सत्ताधारी गटात दाखल झाले आहेत. त्यांच्या निवासस्थानी आमदार पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
जिल्ह्यात गोकुळ दूध संघाची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर सत्ताधारी गटात विद्यमान चार संचालकांनी बंडाचे निशाण फडकावले होते. यामध्ये अरुणकुमार डोंगळे, विश्वास नारायण पाटील, जयश्री पाटील आणि आणि माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या मातोश्री अनुराधा पाटील यांनी महाडिक, पी.एन गटाला रामराम ठोकत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी दाखल झाले होते. सत्ताधारी गटाला हा मोठा धक्का मानला जात होता. परंतु दोनच दिवसात सत्यजित पाटील यांना निर्णय बदलावा लागला. शुक्रवारी सकाळी पाटील आणि महादेवराव महाडिक यांनी सरूडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली तिघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर त्यांनी शाहू आघाडी सोडण्याचा निर्णय जाहीर केला.
शाहू आघाडीत भाजपला पाठिंबा देणारे जनसुराज्यचे आमदार विनय कोरे सहभागी झाल्यामुळे तीव्र पडसाद शाहुवाडी पन्हाळा तालुक्यातील शिवसैनिक उमटले होते. कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे बैठका घेत विरोधी गटात न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सरुडकर यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढू लागल्याने त्यांनी सत्ताधारी गटातील राहण्याचे घोषित केले.
Previous Article”सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षाचा थयथयाट”
Next Article … तर 2 एप्रिलला लॉकडाऊन लावावा लागेल : अजित पवार









