– निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांची माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाचा गोकुळच्या निवडणुकीवर परिणाम होऊ नये यासाठी निवडणूक विभागाने कमालीची दक्षता घेतलेली आहे. मतदान आणि मतमोजणी केंद्रावर येणाऱया अधिकारी, कर्मचारी, मतदान मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची कोरोना संदर्भातील आरटीपीसीआर तपासणी बंधनकारक केली आहे. तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही टेस्ट बंधनकारक आहे. निगेटीव्ह अहवाल प्रमाणपत्र असेल तरच केंद्रावर प्रवेश दिला जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
दरम्यान, मतदान केंद्रासाठी नियुक्त तीनशे कर्मचाऱयांची आरटीपीसीआर टेस्ट शुक्रवारी करण्यात येणार असून याबाबतचा अहवाल दोन दिवसात मिळणार आहे. पॉझिटीव्ह अहवाल येणाऱया कर्मचाऱयांच्या जागी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदानासाठी लागणारे साहित्य 1 मे रोजी संबंधित तालुक्यातील तहसीलदारांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. 2 मे रोजी मतदान झाल्यानंतर तहसीलदारांच्या मार्फतच मतपेटÎा व अन्य साहित्य मुख्यालयात जमा करून घेण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 4 मे रोजी रमणमळा येथील शासकिय इमारतीत मतमेजणी होणार आहे.
मतदारांचे केंद्रा बाहेरच थर्मल स्कॅनिंग
सकाळी सात वाजता 70 मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यावेळी मतदानासाठी आलेल्या मतदारांची केंद्रा बाहेरच थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिजन तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसरात मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. विना मास्क आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
निवडणूक प्रक्रियेत सर्वांनी नियम पाळावेत
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, मतदारांनी नियम पाळावेत आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वर्तण कोणी करु नये. – वैभव नावडकर, निवडणूक निर्णय अधिकारी, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ