प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा बँक व गोकुळ दूध संघाच्या अधिकाऱ्यांची व्यापक बैठक जिल्हा बँकेच्या सभागृहात झाली. बैठकीत दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांमध्ये बँकेकडून दूध वाढीसाठी गोकुळ दूध संघाला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून करावयाच्या 500 कोटी रुपये अर्थपुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा व माहितीची देवाणघेवाण झाली. गोकुळ दूध संघात सत्ता बदल होताच दूध वाढीसाठी 500 कोटी रुपये अर्थपुरवठा करणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्या अनुषंगाने या सविस्तर चर्चा झाली.
यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज प्रकरणाची प्रक्रिया, व्यक्तिगत कर्जपुरवठा माहिती, दूध बिल वितरण प्रक्रिया या विषयांवर चर्चा झाली. बैठकीत गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांचा बँकेच्यावतीने सत्कार झाला.
बैठकीस गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बी. आर. पाटील, तुरंबेकर, चार्टर अकाउंटंट माने, तसेच केडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, प्रशासन विभागाचे व्यवस्थापक गोरख शिंदे, शेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक पांडुरंग रावण, व्यक्तिगत कर्ज विभागाचे व्यवस्थापक दिलीप ढोबळे, लेखा शाखेचे व्यवस्थापक विकास जगताप आदी उपस्थित होते.
मायक्रो एटीएमद्वारे दूध बिले
दूध बिलाचे पैसे उत्पादकांना रोखीने दिल्यास संस्थाना टॅक्स बसतो. परंतु; सर्वच गावात बँका नसल्यामुळे हे शक्य नाही. त्यावर उपाय म्हणून जिल्हा बँकेच्यावतीने बँकेची शाखा नसलेल्या ठिकाणी मायक्रो एटीएम सेवा, ती ही दूधसंस्थेच्या कार्यालयातच देणार आहे.
– डॉ. अशोक माने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा बँक