पन्हाळा तालुक्यातील सेना व कार्यकर्त्याची बैठकीत भूमिका
वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा-शाहुवाडीचे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी गोकुळच्या निवडणुकीमध्ये फक्त शाहुवाडी तालुक्याचा विचार नकरता पन्हाळा तालुक्याचा शाहुवाडीच्या बरोबरीनेच विचार करून आपल्या पराभवाला जबाबदार व कायम भाजपा सोबत असलेल्या विरोधका सोबत गोकुळ साठी एकत्र येवू नये अशी भूमिका माजी आ. सत्यजीत पाटील यांच्या पन्हाळा तालुक्यातील शिवसेना व इतर कार्यकर्त्यानी बैठकीत घेतली आहे.
माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर दादा यांना मानणारी त्यांच्या राजकीय काळापासून एकनिष्ठ कार्यकर्त्यांची मोठी फौज पन्हाळा तालुक्यात असून त्यांच्या सहकार्याने तालुक्यातील गावामध्ये, वाडीवस्तीमध्ये अनेक दुध संस्था स्थापन केलेल्या आहेत,त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील अनेक ठरावधारक संघाच्या निवडणुकीमध्ये त्यांना मदत करण्याच्या विचारात आहेत. कोडोली,सातवे परिसरासोबत बांधारीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा विचार सत्यजित पाटीलांनी करायला हवा असे मतही या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
गत विधानसभा निवडणुकीमध्ये पन्हाळा तालुक्यातील कार्यकर्ते व जनतेने ३६ हजार मते मिळवून दिली आहेत याकडे सत्यजीत पाटील यानी दुर्लक्ष करू नये त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या घटक पक्षांना उघड मदत केलेली आहे त्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसू नये अशी स्पष्ट भूमिका कार्यकर्त्यानी घेतली आहे.









