इंडियन वुमेन्स लीग : बेंगळूर युनायटेडवर 5-1 गोल्सनी एकतर्फी मात
वृत्तसंस्था/ बेंगळूर
गोकुळम केरळा महिला संघाने आपला बहारदार फॉर्म कायम राखत येथे झालेल्या सामन्यात बेंगळूर युनायटेड एफसीचा 5-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवित एक सामना बाकी असतानाच इंडियन वुमेन्स लीगच्या (आयडब्ल्यूएल) उपांत्य फेरी स्थान मिळविले. त्यात कमला देवीच्या हॅट्ट्रिकचा समावेश आहे.
या निकालामुळे केंकरे एफसी संघालाही शेवटच्या चारमध्ये स्थान मिळाले आहे. ते श्रीभूमी संघापेक्षा 5 गुणांनी पुढे आहेत. बेंगळूर संघाला शेवटच्या टप्प्यात स्थान मिळविण्यासाठी हा सामना जिंकण्याची गरज होती. पण या एकतर्फी पराभवामुळे त्यांचे आव्हान आता संपुष्टात आले आहे. स्थानिक संघ असलेल्या बेंगळूर युनायटेड एफसीची खराब सुरुवात झाली आणि तिसऱयाच मिनिटाला गोलरक्षिका कोमल कुमारीने सूर मारत गोकुळमच्या खेळाडूकडून आलेल्या क्रॉसला थोपविण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या पायाला लागून चेंडू त्यांच्याच जाळय़ात गेल्याने गोकुळमला आघाडी मिळाली.
बेंगळूर संघानेही त्याला ताबडतोब प्रत्युत्तर दिले. दोनच मिनिटानंतर पूर्णिमा रावकडून मिळालेल्या क्रॉस पासवर ताबा घेत सत्यबती खादियाने आदिती चौहान गोललाईनच्या पुढे आल्याचे लक्षात घेत तिच्या डोक्यावरून जोरदार लॉब मारत चेंडूला जाळय़ात धाडले. सबित्रा भंडारीच्या वेगवान खेळाने बेंगळूर संघाची स्टॉपेज टाईममध्ये बरीच गाळण उडाली होती. पण त्यांनी गोकुळमची आक्रमणे कशीबशी थोपवण्यात यश मिळविल्याने पूर्वार्धात 1-1 अशी बरोबरी राहिली. दुसरे सत्र मात्र थोडेसे वेगळे ठरले. खेळ सुरू झाल्यावर 25 व्या सेकंदालाच गोकुळमच्या सबित्रा भंडारीने जबरदस्त हेडरवर विनया शेषनला हुलकावणी देत संघाचा दुसरा गोल नोंदवला. 51 व्या मिनिटाला कमला देवीने आणखी एक गोल नोंदवून गोकुळमची आघाडी 3-1 अशी केली. नंतर कोमल कुमारीने भंडारीविरुद्ध फाऊल केल्याने त्यांना पेनल्टी मिळाली, त्यावर कमलाने संघाचा चौथा गोल नोंदवला.
मोठय़ा फरकाने पिछाडीवर पडल्याने बेंगळूर संघ काहीसा सुस्तावला. उर्वरित वेळेत त्यांना फक्त बचाव करावा लागला. तरीही सुप्रिया रूत्रेने डाव्या बगलेतून 35 यार्डावरून मारलेला जोरदार फटका क्रॉसबारला लागला. मात्र स्टॉपेज टाईममधील तिसऱया मिनिटाला कमला देवीने तीन बचावपटूंना हुलकावणी देत संघाचा पाचवा गोल नोंदवून वैयक्तिक हॅट्ट्रिकही पूर्ण केली