दूध उत्पादकांवर दोन रुपयांचा अतिरिक्त भार
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने महालक्ष्मी पशुखाद्य दरात पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत वाढ केली आहे त्यामुळे दूध उत्पादकांना किलोला दोन रुपये अतिरिक्त किंमत मोजावी लागणार आहे. कच्च्या मालाच्या दरात 15 ते 20 टक्के ने दरवाढ झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे अशी माहिती चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.
दूध उत्पादक सभासदांच्या गाई-म्हैशीं करीता महालक्ष्मी गोल्ड पशुखाद्य, मिल्क रिप्लेसर, काफ स्टार्टर, फर्टीमिन व इतर पशुखाद्य पुरवण्यात येते. यावर्षी अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे पिकांवर अनिष्ट परीणाम झालेला आहे. तसेच चक्रीवादळ आदी नैसर्गिक आपत्तीमुळे पशुखाद्य उत्पादनासाठी लागणाऱ्या शेतीपूरक कच्च्या मालाच्या उपलब्धतेमध्ये सातत्याने टंचाई निर्माण झाली आहे. याशिवाय इंधन दरात झालेली वाढ, अनुषांगिक वाहतूक खर्चातील वाढ यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कच्च्या मालाच्या दरात सरासरी १५ ते २५ % इतकी वाढ झाली आहे. तरीही संघाने आज पर्यंत पशुखाद्य विक्रीदरात वाढ केली नव्हती. गेली तीन वर्ष पशुखाद्य दर स्थिर ठेवलेले होते. परंतु सध्याचा दर पुढे सुरु ठेवणे आज संघास आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे ही दरवाढ करावी लागत आहे अशी गोकुळच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.









