प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज अवैध ठरलेल्या १४ जणांच्या याचिकेवर गुरूवारी विभागिय सहनिबंधक (दुग्ध) सुनिल शिरापुरकर यांच्या समोर सुनावणी पुर्ण करण्यात आली. याच्यावर आज शुक्रवार दि. १६ रोजी शक्य न झाल्यास सोमवार दि. १९ रोजी निर्णय देण्यात येणार आहे.
गोकुळ निवडणूकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जा पैकी ७६ जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले होते. यापैकी ३५ जणांनी हरकत घेतली होती. परंतू निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी तात्काळ सुनावणी घेवून सर्वांची हरकत फेटाळली होती. या निर्णयाच्या विरोधात ३५ पैकी १४ जणांनी विभागिय सहनिबंधक (दुग्ध) यांच्याकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवरती आज सुनावणी घेण्यात आली. गोकुळ दूध संघाच्या कात्रज येथील कार्यालयातील प्रशिक्षण हॉल मध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शासन नियमांचे पालन करताना सामाजिक अंतर ठेवत सुनावणी घेण्यात आली.
या सुनावणीला १४ याचिकाकत्यांपैकी प्रत्यक्षात भारती विजयसिंह डोंगळे, अजित पाटील (परिते), गंगाधर व्हसकुटे व यशवंत नांदेकर या चौघाच्यावतीने ॲड. प्रबोध पाटील उपस्थित राहून म्हणणे मांडले. तर इतर ११ जणांनी ईमेलद्वारे म्हणणे सादर केले होते. या सर्वांनी सादर केलेल्या म्हणण्यावर गोकुळच्यावतीने ॲड.लुईस शहा यांनी उत्तर देत निवडणूक निर्णय अधिकारी नावडकर यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण घेत विभागिय सह निबंधक (दुग्ध) शिरापुरकर यांनी निर्णय राखून ठेवला असून सोमवार पर्यंत निर्णय देण्यात येणार असल्याचे सांगितले.









