प्रतिनिधी / कोल्हापूर
गोकुळच्या सत्ताधारी गटाने गोकुळचा कारभार नेहमीच पारदर्शी व दूध उत्पादक सभासदांच्या हिताचाच केला आहे. गोकुळचे चेअरमन म्हणून मी केलेल्या स्वच्छ कारभारामुळे विरोधकांना टीका करण्यास वाव नाही. यामुळे विरोधक माझ्या तब्येतीचे कारण पुढे करत मी निवडणुकीला उभा राहणार नसल्याच्या अफवा पसरत आहेत. परंतु माझी तब्येत सुधारली असून मी निवडणूक रिंगणात उतरणार आहे. दूध उत्पादक आणी संस्था ठराव धारक सभासदांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
आपटे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तब्येतीच्या कारणास्तव मी होऊ घातलेल्या गोकुळ निवडणुकीमध्ये निवडणूक रिंगणात असणार नसल्याची चर्चा जाणीवपूर्वक विरोध करत आहेत. विरोधकांच्या प्रचार दौऱ्यात अनेक ठिकाणी दूध संस्था ठराव धारकांनी आम्हाला रवींद्र आपटे यांचे गेल्या पस्तीस वर्षात मोठे सहकार्य मिळाले असल्याने आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशी भूमिका मांडली. त्यावेळी रवींद्र आपटे यांची तब्येत ठीक नसल्याने ते निवडणूक लढवणार नाहीत अशी चुकीची माहिती विरोधक देत आहेत. परंतु माझी सध्या प्रकृती सुधारली असून गेल्या महिन्यापासून मी गोकुळच्या दैनंदिन कामकाजात सहभाग घेतला असून गोकुळ बाबत सत्ताधारी गटाकडून होणाऱ्या बैठकीसाठी मी उपस्थित राहतो. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर दूध उत्पादक आणि संस्था ठरावधारक सभासदांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन रवींद्र आपटे यांनी यावेळी केले आहे .
Previous Article”ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये”
Next Article सतीश जारकिहोळी बेळगावातून लढणार









