अध्यक्ष विश्वास पाटील यांचे प्रतिपदान
कोल्हापूर प्रतिनिधी
गोकुळने नेहमीच ग्रामीण दूध उत्पादक महिलांना केंद्र बिंदू मानून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. दूध उत्पादक महिलांसाठी दूध व्यवसायाचे प्रशिक्षणातून मार्गदर्शन करून किफायतशीर दूध व्यवसाय करण्यासाठी विविध सेवा सुद्धा पुरवल्या जातात. गोकुळ दूध संघ, एन.डी.डी.बी. व सस्टेन प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत ग्रामीण महिलांना पशुपालन व्यवसायामधून दूध उत्पादना बरोबरच घरगुती वापरासाठी इंधन व शेतीसाठी सेंद्रिय खत मिळणार आहे. त्यामुळे गोकुळचा बायोगॅस प्रकल्प महिला दूध उत्पादकांसाठी नक्कीच आर्थिक फायदा देणारा ठरेल, असा विश्वास गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
जिह्यातील दूध उत्पादक महिलांसाठी गोकुळ, एन.डी.डी.बी., सस्टेन प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत बायोगॅस प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन इस्पुर्ली (ता. करवीर) येथे गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष पाटील बोलत होते.
गोकुळच्या बायोगॅस प्रकल्पातंर्गत चुये, वडकशिवाले, कावणे, निगवे खालसा, इस्पुर्ली, येवती, म्हाळुंगे, बाचणी आदी ठिकाणी 120 बायोगॅस बसवण्यात आले आहेत. लाभार्थीचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन चुये (ता. करवीर) येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत गोकुळचे संचालक शशीकांत पाटील चुयेकर यांनी केले. प्रोजेक्टची माहिती निता कामत यांनी दिली. यावेळी जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, एन.डी.डी.बी.चे अधिकारी निरंजन कराडे यांनी मार्गदर्शन केले. इस्पुर्ली येथील महिला दूध उत्पादक छाया कुराडे यांनी आभार मानले.
यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, एन.डी.डी.बी.चे अधिकारी पटेल, सस्टेन प्लसचे धर्मेंद्रकुमार आदीं उपस्थित होते.
असा आहे बायोगॅस प्रकल्प
या प्रोजेक्ट अंतर्गत निवडक गावांमध्ये बायोगॅस बसवले आहेत. या बायोगॅसला 45 ते 50 किलो शेण प्रतिदिन व 50 लिटर पाणी मिक्स करून घालायचे. यातुन तयार होणारा गॅस स्वयंपाकसाठी वापरता येतो. प्रकल्पामुळे महिन्याच्या दीड सिलेंडरची बचत होणार असून उत्पादकांचा 1500 रुपयांचा फायदा होणार आहे. तसेच प्रतिदिनी 50 लिटर मिळणारी स्लरी गोकुळकडून सरासरी 1 रुपये प्रमाणे विकत घेतली जाणार आहे. म्हणजे रोज 50 रुपये स्लरी(द्रवरूप शेणखत) चे महिन्याला रुपये 1500 दूध उत्पादकला स्लरीपासून मिळणार आहेत. बायोगॅस मधून इंधनासाठी गॅसनिर्मिती व त्यातून बाहेर पडणारी स्लरी (द्रवरूप शेणखत) शेतीसाठी उत्तम खत म्हणून वापरता येईल. असा हा फायदेशीर प्रोजेक्ट एन. डी.डी.बी अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम गोकुळने राबवला आहे.