पाचजण जखमी : सौंदत्ती देवस्थानला जाताना काळाचा घाला
वार्ताहर/ घटप्रभा
गोकाक-यरगट्टी राज्यमार्गावरील ममदापूर क्रॉसजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या कँटर ट्रकला धडक दिल्यामुळे कारमधील सात जखमीमधील दोघा गंभीर जखमींचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी गोकाकातील खासगी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे.
वैजयंती अनिल अंबी (वय 45) व मुलगा सुनील अनिल अंबी (वय 22) रा. सांगलीवाडी ता. मिरज, जि. सांगली अशी मृतांची नावे आहेत.
सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथून टाटा सुमोने सौंदत्ती येथील देवीच्या दर्शनासाठी जात असताना रात्री गोकाक येथून जवळच रस्त्यावर उभ्या असलेल्या कँटर ट्रकला धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात घडला. या अपघातातील सुमो वाहनातील सर्व जखमींना उपचारासाठी गोकाककडे घेऊन जात असताना वाटेतच आई व मुलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.
राजू उर्फ रावसाहेब आण्णासो सुतार (रा. नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) व सांगलीवाडी येथील लता विष्णू पाटील, संगीता संभाजी पाटील, राजमती सुरेश अंबी, कलावती रावसाहेब अंबी अशी जखमींची नावे आहेत. या सर्व जखमींना गोकाक येथील खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून दोन्ही वाहन चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कँटर चालक रमेश मडवाळप्पा ग•ाr (रा. शिवापूर, ता. गोकाक) असून अधिक तपास करण्यात येत आहे.









