सरकारी रुग्णालयात प्रकल्पाचे काम गतीने : आमदार रमेश जारकीहोळींकडून पाहणी
वार्ताहर / घटप्रभा
पहिल्या व दुसऱया टप्प्यात आलेल्या कोरोना संकटामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. आरोग्य सुविधाही तोकडी पडल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला. यावर मात करण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी राज्यशासनाने पुढाकार घेतला आहे. गोकाक येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीतून प्लांट उभारण्याचे काम गतीने सुरू असून आमदार रमेश जारकीहोळी यांनी प्लांटला भेट देऊन नुकतीच पाहणी केली.
यावेळी ते म्हणाले, राज्य सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत प्रत्येक तालुक्यातील रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प निर्मितीसाठी पावले उचलण्यात आली आहेत. या योजनेतून गोकाक येथील सरकारी रुग्णालयात 500 लीटर क्षमता असणारा ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी सरकारकडून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
आठवडाभरात काम पूर्ण
आमदार जारकीहोळी पुढे म्हणाले, सदर प्रकल्पाचे काम येत्या आठवडय़ाभरात पूर्ण होणार आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. असे असतानाच अनेक तज्ञांनी तिसऱया लाटेचा धोका वर्तविला आहे. या अनुषंगाने राज्य सरकार नियोजन करीत आहे. तिसरी लाट आल्यास येथील ऑक्सिजन प्रकल्प लाभदायक ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जि. पं. सदस्य तुकाराम कागल, मंडय़ाप्पा तिळीण्णावर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. मुत्यण्णा कोप्पद, डॉ. रवींद्र ऍन्टीन, नगराध्यक्ष जयानंद हुनश्याळी, डॉ. बागलकोटी, डॉ. कोण्णी, डॉ. अशोक जिरग्याळ यांच्यासह अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.