गोव्याचा मुक्तीलढा हा फार मोठा आहे. गोवा मुक्तीसाठी अनेक दिग्गजांनी बलिदान दिलेले आहे. 1946च्या क्रांतीने त्याला मूर्त स्वरुप प्राप्त झाले. गोवा मुक्तीलढय़ामध्ये ना केवळ गोमंतकीय, हैदराबाद, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार अशा अनेक प्रांतातून वीरांनी येऊन लढा दिला. असंख्य महिलाही या लढय़ात सहभागी झाल्या होत्या. भारताला स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947 रोजी पण त्यानंतरही पुढील 14 वर्षे गोव्याचा मुक्तीलढा सुरू होता. गोव्यातून पोर्तुगीज सत्ता संपण्यासाठी 19 डिसेंबर 1961 हा दिवस उजाडावा लागला. गोवा राज्य पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाल्यास यंदा 60 वर्षे होत आहेत. या मुहूर्ताच्या निमित्ताने ‘गोंय… एक जैतकथा’ या महानाटय़ाची निर्मिती झाली.
गोवा मुक्तीच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त राजीव गांधी कला मंदिर फोंडा गोवा व माहिती आणि प्रसिद्धी संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गोंय.. एक जैतकथा’ या महानाटय़ाची निर्मिती करण्यात आली आहे. नामवंत कोकणी साहित्यिक पुंडलिक नारायण नायक लिखित व नीलेश महाले यांनी दिग्दर्शित केलेले हे महानाटय़ डॉ. शामाप्रसाद मुखर्जी ऑडिटोरियम ताळगाव येथे पाहण्याचा योग आला. या महानाटय़ाद्वारे कलाकारांनी सुंदर आविष्कार घडविला. या महानाटय़ाचे प्रयोग तालुकास्तरावर होणे आवश्यक आहेत जेणेकरून सध्याच्या पिढीला, विद्यार्थ्यांना गोवा मुक्तिलढय़ाच्या इतिहासाची तसेच संस्कृतीची ओळख होईल.
गोवा मुक्तीसाठी ज्या ज्ञात-अज्ञात वीरांनी, स्वातंत्र्यसेनानींनी, असंख्य नागरिकांनी अनेक हालअपेष्टा सोसून, प्राणांची आहुती देऊन गोमंतभूमी परकीय जोखडातून स्वतंत्र केली, त्या वीर सुपुत्रांचा परिचय आजच्या पिढीला व्हावा, त्या त्यागाचे महत्त्व लोकांना कळावे आणि आज स्वतंत्र गोमंतकात आपण जो मोकळा श्वास घेत आहोत, त्या मागचा खरा इतिहास लोकांना कळावा, हा या समूहनाटय़ निर्मितीमागचा प्रामाणिक हेतू आहे. या महानाटय़ाद्वारे आजच्या पिढीला गोमंतकीय संस्कृतीचीही ओळख होणार आहे.
यातना, अमानुषता आणि सहनशीलता यांचे विदारक चित्रण, गोमंतकीयांचे धर्मांतर स्वेच्छेने की जबरदस्तीने? गोमंतकीयांनी आपला धर्म बदलला पण आपली संस्कृती बदलली नाही. वर्णव्यवस्थेमुळे पोखरलेल्या हिंदू धर्मावर आघात करणे, गोवा मुक्तीचा छ. शिवाजी-संभाजी महाराजांचा मनोदय, गोमंतकीय लोककला, लोकगीते, लोकनृत्य यांचा आविष्कार, नाटय़, नृत्य आणि संगीताचा आगळावेगळा आविष्कार ही या समूह नाटय़ातील वैशिष्टय़े आहेत.
महानाटय़ाची संकल्पना कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची आहे. साहाय्यक लेखन पांडुरंग नाईक, सत्यवान नाईक, मराठी अनुवाद सविता देसाई, साहाय्यक दिग्दर्शन गिरीश वेळगेकर, श्रीकांत गावडे, लोकसंगीत व लोकनृत्य दिग्दर्शन कांता गावडे, नितीन म्हार्दोळकर, चेतन खेडेकर, संगीत दिग्दर्शन व पार्श्वसंगीत अजय नाईक, पार्श्वसंगीत साहाय्यक सचिन चौगुले, रंगभूषा एकनाथ नाईक, प्रकाशयोजना सुशांत नाईक, प्रकाशयोजना साहाय्यक श्रीनिवास उसगावकर, नेपथ्य किरण नाईक, वेषभूषा श्रीकांत गावडे, वेषभूषा साहाय्यक जुजे गोयस, दीपलक्ष्मी नाईक, नृत्य दिग्दर्शन प्रतिभा नाईक, निवेदन गिरीश वेळगेकर, सिद्धी उपाध्ये, छायांकन व संपादन साईनाथ परब, सूत्रधार श्रीकांत गावडे या सर्वांनी व्यवस्थितपणे महानाटय़ाची बाजू सांभाळलेली आहे. अभिनय, संगीत व नृत्य सादरकर्ते अंत्रुज महालातील कलाकार आहेत. स्वातंत्र्यसेनानी नागेश करमली, डॉ. नंदकुमार कामत, डॉ. सुधीर तडकोडकर, स्व. गुरुनाथ केळेकर, डॉ. भूषण भावे, प्रजल साखरदांडे यांचे संशोधन आहे. गीतरचना बाकीबाब बोरकर, गजानन रायकर, मनोहर सरदेसाई, ऍड. उदय भेंब्रे, शंकर भंडारी, संत सोहिरोबानाथ आंबिये, कृष्णंभट बांदकर, फा. थॉमस स्टीफन, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आहे. या महानाटय़ात पारंपरिक फुगडी, धालो, जागर, धनगर नृत्य, कुणबी नृत्य, गोफ, धेंडलो, कार्निव्हल, शिमगो, वीरभद्र या कलेचे दर्शन घडलेले आहे. या सर्व कलाकार टीमचे अभिनंदन.
या नाटकात अनेक स्वातंत्र्यसेनानी, हुतात्म्यांचा उल्लेख झाला असला तरी पालये-पेडणे येथे हुतात्मा झालेल्या पन्नालाल यादव यांचा नामोल्लेख झाला नसल्याने खेद वाटला. जाज्वल्य देशभक्तीचे प्रतीक असलेला तिरंगा श्री भूमिका वेताळ मंदिरावर फडकावण्याचे धाडस पन्नालाल यादव यांनी 15 ऑगस्ट 1955 रोजी दाखविले होते. ‘जोपर्यंत आपल्या कुडीत प्राण आहे, तोपर्यंत हा ध्वज मिळणार नाही’, अशी भीष्मप्रतिज्ञा यादव यांनी केली होती. परिणाम व्हायचा तोच झाला. जुलमी अधिकाऱयांनी पोर्तुगीज फिरंग्यांनी पन्नालाल यादव यांच्यावर गोळय़ा झाडल्या. पन्नालाल यादव यांच्या रुपाने एक देह भारतमातेच्या कामी आला. पन्नालाल यांचे राजस्थानमधील राजमंडी हे मूळ गाव. नगरपालिकेत ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. गोमंतकाला पोर्तुगीज जुलुमातून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांची एक तुकडी जाणार, अशी बातमी पन्नालाल यादव यांनी रेडिओवर ऐकली. बस्स! तोच क्षण यादव यांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटविण्यासाठी पुरेसा ठरला. या देशभक्ताने सरळ स्वातंत्र्यसैनिकांच्या तुकडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यसैनिकांनी सुरुवातीला नकार दिला. तरी यादव यांनी त्यांना अर्ध्या रस्त्यावर सिंधुदुर्गात गाठलेच. आरोंदा येथे तेरेखोल खाडीच्या किनाऱयावर पन्नालाल यांच्याकडे एका तुकडीचे नेतृत्त्व आले. या तुकडीची कामगिरी होती श्री भूमिका वेताळ मंदिरावर तिरंगा फडकाविण्याची. पहाटे सारा गाव शांत झोपला होता. स्वातंत्र्याच्या त्या पहाटे ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात पन्नालाल यांनी तिरंगा घेत थेट मंदिराचा कळस गाठला. तेवढय़ात ही वार्ता पोर्तुगीजापर्यंत पोहोचली. शेकडो संगिनीधारी सैनिक मंदिराजवळ येऊन पोहोचले. ‘खबरदार, झेंडा फडकाविलास तर…’, अशा धमक्या सुरू झाल्या होत्या पण पन्नालाल यांच्यासमोर एकच मूर्ती होती ती म्हणजे भारतमातेची. ‘तुजसाठी मरणे हेच जगणे’, अशी घोषणा देत पन्नालाल यांनी अभिमानाने तिरंगा फडकाविला. त्याचवेळी चिडलेल्या अधिकाऱयांनी गोळय़ा झाडून पन्नालाल यांच्या देहाची चाळण केली. तरीही शेवटपर्यंत पन्नालाल यांनी तिरंगा सोडला नाही. पालये गावातील ग्रामस्थ, ग्रामप्रमुखांनी या हुतात्म्याला मानसी-पालये येथे अग्नी दिला. ‘गोंय.. एक जैतकथा’ या महानाटय़ाचे अन्य ठिकाणीही प्रयोग होणार आहेत. यापुढे या महानाटय़ात याचा नामोल्लेख करावा, अशी सूचना लेखकाला करावीशी वाटते. या हुतात्म्याचे पालये-पेडणे गावात स्मारकही झाले नाही, याबद्दल दुःख वाटते. बाहेरून येऊनही गोव्याला मुक्त करण्याचा निःस्वार्थीपणाने ध्यास बाळगणाऱया पन्नालाल यादवसारख्या हुतात्म्यांच्या कुटुंबांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. त्यांच्या कुटुंबियांचा गोवा सरकारने यथोचित सन्मान करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गोमंतक भूमीसाठी त्यांनी दिलेले बलिदान खऱया अर्थाने सार्थकी लागेल.
गोव्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ महानाटय़ाचे प्रयोग झाले. या महानाटय़ाद्वारे प्रेरणा घेऊन गोव्यातील काही लेखक मंडळींनी काही विषयांवर महानाटय़े साकारलेली आहेत. याचीच प्रेरणा घेऊन कोकणी साहित्यिक पुंडलिक नायक यांनी केलेला हा प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. पुंडलिक नायक हे नामवंत कोकणी साहित्यिक आहेत. साहित्याचे सर्व प्रकार त्यांनी हाताळून स्वतःची अशी ठळक आणि स्वतंत्र छाप निर्माण केली आहे. त्यांचे साहित्य अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाचा विषय झालेला आहे. गोवा, कर्नाटक, केरळ विद्यापीठामध्ये त्यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. त्यांच्या साहित्याचे भारतीय व परदेशी भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. पीएचडी संपादनासाठी त्यांच्या साहित्यावर संशोधन करणाऱया विद्यार्थ्यांचीही संख्या वाढत आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या नाटक व कादंबऱयांवर परिसंवाद, चर्चासत्रे झालेली आहेत. ‘गोंय.. एक जैतकथा’ या महानाटय़ाचे लेखन करून त्यांनी बजाविलेली ही कामगिरी अभिनंदनास पात्र आहे.
गोवामुक्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण आहोत. ज्या ज्ञात-अज्ञातांनी गोवा मुक्ती आंदोलनासाठी झालेल्या क्रांतीमध्ये उडी घेतली, बलिदान दिले, हौतात्म्य पत्करले, धारातिर्थी पडले त्या शूरवीरांना खऱया अर्थाने या महानाटय़ाद्वारे आदरांजली ठरणार आहे.








