आपतर्फे राज्यात नव्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ
प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पक्षाने मंगळवारपासून ’गोंयांक बदल जाय, केजरीवाल जाय’ या नवीन प्रचार मोहिमेचा शुभारंभ केला. आपच्या पणजी कार्यालयात उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक, राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष सेसिल रॉड्रिग्स आणि डॉ. विभास प्रभुदेसाई यांनी या मोहिमेची घोषणा केली.
गोव्यातील नागरिकांनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांना आपले प्रेम दाखवले आहे. वीज आंदोलनात राज्यातील 2.93 लाख कुटुंबांनी केजरीवाल यांच्या 300 युनिट मोफत वीजसाठी पाठिंबा दर्शवला आहे. याच दरम्यान केजरीवाल यांनी अलीकडेच केलेल्या नोकरीच्या हमीचीही राज्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे, असे नाईक यंनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
केजरीवाल यांच्या रोजगार हमीमुळे भाजपला प्रचंड धक्का बसला. त्या हादऱयातून सावरण्यासाठी त्यांना 24 तास लागले. त्यानंतरच त्यांनी विविध ठिकाणी पत्रकार परिषदा आयोजित करून प्रतिक्रिया दिल्या. मात्र त्यातून त्यांनी भाजप गोव्याला नोकऱया का देऊ शकत नाही याचे उत्तर तर दिले नाहीच. ते नक्की बोलले तेही कुणाला समजले नाही. त्यामुळे तो विनोदाचा भाग ठरला, असे नाईक पुढे म्हणाले.
राज्य चालविण्यास ’आप’ पात्र
कोरोनाकाळात राज्यात जवळजवळ प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने नोकरी गमावली आहे. पर्यटनावर आधारित नोकऱयांना मोठा फटका बसला आहे. भरीस भाजप व काँग्रेसच्या भ्रष्ट वृत्तीमुळे खाण व्यवसायही बंद असल्याने गंभीर स्थिती उद्भवली आहे. अशा प्रसंगी केवळ आपच गोमंतकीयांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. अद्याप एक सुद्धा आमदार नसताना जो पक्ष एवढा बदल घडवू शकतो तो राज्य चालविण्यास पात्र आहे, असा विश्वास गोमंतकीयांच्या मनात निर्माण झाला आहे, असे नाईक म्हणाले.
आपच्या रूपाने गोमंतकीयांना हवा आहे बदल
कोरोनाच्या संकटकाळात सरकार व अन्य पक्षांचे आमदार, नेते लपून बसले होते. त्यावेळी केवळ आपच काम करत होता. पक्षाने गोव्यात 300 पेक्षा जास्त वीज आंदोलनांचे आयोजन केले. ऑक्सजिन चाचणी केंद्रांची स्थापना केली, आणि ऑक्सिमीटर सेवेद्वारे घरोघरी जाऊन काम केले. महामारीच्या काळात आपच्या स्वयंसेवकांनी प्रत्येकाला वैद्यकीय सेवेपासून ऑक्सजिन सिलिंडरपर्यंत सर्वकाही मिळवण्यासाठी दिवस-रात्र काम केले. त्यामुळे गोवेकरांना आता आम आदमी च्या रूपाने राज्यात बदल हवा आहे, हेच स्पष्ट होत आहे,
वचनपूर्ती करणार याबद्दल ठाम विश्वास विद्यमान फसव्या राजकारण काळात केवळ आम आदमी पक्षच सुशासन व बदलाचे राजकारण देत आहे, असे सेसिल यांनी सांगितले. केजरीवाल जे बोलतात ते करून दाखवतात. ते 24 तास अखंड मोफत वीज, रोजगार हमी, नोकरी मिळेपर्यंत मासिक तीन हजार रुपये बेरोजगारी भत्ता, यासारखी ज्या अनेक घोषणा आणि आश्वासने त्यांनी दिली आहेत ती ते नक्कीच पूर्ण करतील याचा सर्वांना ठाम विश्वास आहे. म्हणूनच ’गोंयांक बदल जाय, केजरीवाल जाय’ असेही सेसिल यांनी सांगितले.









