बेळगाव : आलेमारी आणि आरेआलेमारी समाजातील गोंधळी, बुड, बुडकी, जोशी समाजातील शिक्षण, सामाजिक आणि राजकीय कलाशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी 22 लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मात्र हे अनुदान चार वर्षांपासून मंजुरीविना थांबविण्यात आले आहे. याची चौकशी करून तातडीने मंजूर करावे, समुदायातील नागरिकांना जात प्रमाणपत्रावर आलेमारी असे नमूद करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी सुवर्णसौध येथे आंदोलन छेडण्यात आले.
अखिल कर्नाटक गोंधळी समाज संघटनेच्यावतीने बुधवारी कोंडुसकोप येथे धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी समुदायाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन केले. समुदायाला प्रत्येक क्षेत्रात 3 टक्के आरक्षण देण्यात यावे. वसती योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी 5 लाखांचे अनुदान मंजूर करावे, मुलांच्या प्राथमिक आणि उच्च शिक्षणाचे शुल्क माफ करण्यात यावे, आलेमारी समाजातील लहान, मोठ्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी 3 लाखांचे अनुदान देण्यात यावे, तसेच आलेमारी समाजाला एससीएसटी आरक्षण मिळावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.









