विधानपरिषदचे कामकाज दोनवेळा तहकूब
प्रतिनिधी /बेळगाव
सोमवारी विधानपरिषदेमध्ये सुरुवातीलाच काँग्रेसच्या सदस्यांनी धरणे आंदोलन धरले. उत्तर कर्नाटकच्या विकासासंदर्भात, म. ए. समितीबाबत आणि त्या मंत्र्याच्या राजीनाम्याबाबत पुन्हा आंदोलन छेडले. मात्र सभापती बसवराज होरट्टी यांनी त्या गोंधळातच कामकाज सुरू केले. सुरुवातीला दहा मिनिटे तहकूब केले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाले आणि त्यांनी गोंधळातच प्रश्न आणि उत्तरे मांडण्यास सांगितले.
यावेळी काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकारचा तीव्र निषेध नोंदविला. भ्रष्ट भाजप सरकार असल्याचा आरोप काँग्रेसच्या सदस्यांनी केला. यावेळी सभापती बसवराज होरट्टी यांनी गोंधळातच अनेकांना प्रश्न, उत्तरे देण्यास भाग पाडले. त्यामुळे सभागृहात नेमके काय चालले आहे, हे समजणे अवघड झाले. भाजपच्या अनेक सदस्यांनी विविध प्रश्न विचारले. याचबरोबर मंत्र्यांनीही त्याची उत्तरे दिली. मात्र यावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.
काँग्रेसवर कडाडून टीका
सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबाबत तसेच इतर राज्याच्या समस्यांबाबत चर्चा होणे गरजेचे असताना केवळ काँग्रेस विरोध करत असल्याचा आरोप सभागृहाचे मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी केला. यावेळी अनेक मंत्र्यांनीही काँग्रेसवर कडाडून टीका केली. तरीदेखील काँग्रेसच्या सदस्यांनी हातात फलक घेऊन सभापतींच्या आसनासमोर आपली निदर्शने सुरूच ठेवली होती. त्यामुळे दुपारी 1.45 वाजता सभापतींनी पुन्हा काम स्थगित करून दुपारी 3 वाजता काम सुरू होईल, असे सांगितले.









