ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत, तसेच मृत्यू दरात वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 211 रुग्णांची भर पडून देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 हजार 363 वर पोहचली आहे. तसेच 24 तासात 31जण दगावले आहेत. त्यामुळे देशात मृत्यू पावलेल्यांची संख्या 339 वर पोहोचली आहे. तर 1036 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
ते म्हणाले, काल 21 हजाराहून अधिक लोकांचे टेस्ट केल्या गेल्या. तर आत्तापर्यंत दोन लाख 31हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. देशात गरिबांना मोफत रेशन दिले जात आहे. तसेच गरीब लोकांना योग्य ती मदत केली जात असून अजून तीन महिने मोफत रेशन दिले जाईल. आत्तापर्यंत 5. 29 कोटी लोकांना मोफत रेशन दिले आहे, अशी माहिती आयसीएमआर च्या प्रवक्त्यांनी यावेळी दिली.
देशात अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर कंट्रोल रूम मार्फत 24 तास नजर ठेवली जात आहे. तर मजुरांच्या तक्रारी दूर करण्यासाठी तक्रार निवारण केंद्र तसेच हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. आत्तापर्यंत 5 हजार तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.