एकोणिसाव्या शतकात चीन नावाचा अजस्त्र आकाराचा आणि प्रचंड लोकसंख्येचा परंपरावादी देश आधुनिक शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या अभावी इतर देशांचा अंकित होता. मोठा भौगोलिक आकार आणि मोठी लोकसंख्या असूनही चीनला जगापुढे झुकावे लागले होते. 1894-95 मध्ये जपानशी झालेल्या युद्धात चीनचा दारुण पराभव झाला. लाखो चिनी मारले गेले. यावेळी अखंड चीनमध्ये चारशेहून अधिक वर्षे जुनी चिंग (Qing) राजवट होती. त्यांनी जागतिक दबावाला झुकून अनेक विदेशी कंपन्यांना गुंतवणूक करण्यासाठी मोठे भूखंड आणि इतर सवलती दिल्या होत्या. त्यातून चीनचे विदेशी लोकांकडून शोषण होते आणि चीन गरीब राहिला अशी सामान्य लोकांची भावना होती. त्यातूनच 1890 साली चीनच्या विविध प्रांतातले मार्शल आर्ट्समधले (कुंग फू वगैरे) खेळाडू एकत्र येऊन त्यांनी विदेशी सत्तांविरुद्ध बंड केले. इतिहासात हे बंड बॉक्सर्सचे बंड म्हणून ओळखले जाते.
आपण ब्रूस ली वगैरेंचे चित्रपट पाहतो आणि त्यातून अनेकांना या मार्शल आर्ट्सविषयी आकर्षण निर्माण होते. चीनमधल्या या खेळाडूंना देखील स्वतःच्या शक्तींबद्दल जोरदार अभिमान होता. 1890 साली त्यांनी यिहेक्वान नावाचा गुप्त गट स्थापन करून देशभरात विदेशी लोकांवर आणि धर्मांतर केलेल्या ख्रिस्ती चिन्यांवर हिंसक हल्ले सुरू केले. अनेकांना ठार केले. रेल्वे स्टेशन्स आणि सरकारी कचेऱया उद्ध्वस्त केल्या. दहा वर्षांनी 20 जून 1900 रोजी ते राजधानीत पोचले. चिंग राजवट ताब्यात घेतली. असंख्य विदेशी लोकांना आपल्या मार्शल आर्ट्सच्या सहाय्याने ठार केले. चिंग सम्राज्ञीने विदेशी सत्तांविरुद्ध युद्ध घोषित केले.
14 ऑगस्ट रोजी जपान-ब्रिटनसह 8 देशांनी 20,000 खडे सैन्य आधुनिक शस्त्रे घेऊन चीनमध्ये उतरवले. अल्पावधीत बंड शमले. मार्शल आर्ट्सपटूंना अटक करून चौकाचौकात जाहीर शिरच्छेद केले. 7 सप्टेंबर रोजी जेत्यांबरोबरच्या करारानुसार बीजिंगमधले किल्ले जमीनदोस्त केले.यानंतर अमेरिकेने चीनमध्ये सशर्त गुंतवणूक केली, त्या रकमेतून बीजिंगमध्ये विद्यापीठ स्थापन झाले. आठ देशांनी आपापल्या नागरिकांच्या रक्षणासाठी चीनमध्ये खडे सैन्य ठेवण्याचा निर्णय घेतला. चीनला दोन वर्षे शस्त्रखरेदीला मनाई करण्यात आली. सर्व देशांनी चीनकडून 33 कोटी डॉलर्स नुकसानभरपाई वसूल केली. लवकरच चिंग राजवट लयाला गेली.
त्याच वेळी आपला देश देखील ब्रिटिशांशी लढा देत होता, पण वेगळय़ा मार्गाने.








