ऑनलाईन टीम / पणजी
गोवा विधानसभा २०२२ एका विशेष कारणाने देशभर चर्चत आली आहे. याचे कारण म्हणजे गोव्यातील अनेक राजकिय नेत्यांनी अनेक कारणांनी पक्षांतर केले आहे. तर काही नेत्यांनी आपल्याला संबधीत पक्षाने आपल्या उमेदवारी दिली नाही. हे कारण देत कोलांड उड्या मारल्या आहेत. यामुळे राष्ट्रीय काँग्रेस सारख्या पक्षात १७ सदस्यांवरुन हा आकडा आता केवळ २ आला आहे. निवडणूक यंत्रणा आणि राजकारण्यांवर नजर ठेवणाऱ्या एडीआरच्या अहवालानुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे कि, गोवा विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत ६० टक्के आमदारांनी पक्ष बदलला आहे.
यावरुन गोव्यातील निवडून आलेल्या आमदारांनी जनादेशाला काळीमा फासत देशातील अन्य कोणत्याही राज्यात झाले नाही असा अपमान करत जनतेच्या हातावर तुरी ठेवल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत सुमारे २४ आमदारांनी पक्षांतर केले आहे, ज्यांची संख्या ही ४० सदस्यीय विधानसभेच्या ६० टक्के आहे.
एडीआरच्या अहवालानुसार हे स्पष्ट होते कि, सध्याच्या विधानसभेच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ४० पैकी २४ आमदारांनी पक्ष बदलला आहे. भारतात असे कुठेही घडले नाही. हे जनतेने दिलेल्या स्पष्ट जनादेशाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. नेत्यांनी राजकारणातील नैतिकता आणि शिस्तीचेही उल्लंघन केले आहे.एडीआरने आपल्या अहवालात २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाचा राजीनामा दिलेल्या आणि भाजपाच्या तिकिटावर लढलेल्या नेत्यांची नावे समाविष्ट केलेली नाहीत. तर या नेत्यांमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार विश्वजित राणे, सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांचा समावेश आहे. सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. नंतर दोघेही पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.
२०१७ मध्ये काँग्रेसने सुमारे १७ जागा जिंकल्या होत्या. पण आज देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रसचे विधानसभेत फक्त दोन सदस्य आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आणि सुमारे १० आमदार भाजपामध्ये सहभागी झाले. त्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, जेनिफर मॉन्सेरेट, फ्रान्सिस्को सिल्व्हेरिया, फिलिप नेरी रॉड्रिग्ज, विल्फ्रेड नाझरेथ मेनिनो, क्लॅफसिओ डायस, अँटोनियो कॅरानो फर्नांडिस, नीळकंठ हालरंकर, इसिडोर फर्नांडिस, अटानासिओ मोन्सेरात यांचा समावेश होता. याबरोबर काँग्रेसचे आमदार रवी नायक यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते आणि आमदार लुइझिन्हो फालेरो यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. तसेच, काँग्रेसचे आमदार अॅलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.








