पावसाळ्य़ाची चिन्हे दिसत नाहीत पावसाने दाखविल्या वाकुल्या
प्रतिनिधी /पणजी
केरळमधून गोव्याकडे सरकलेला मान्सून कारवारमध्ये कुठे गायब झाला हे कळेनासे झाले असून मान्सूनला पुरक असे वातावरण अद्याप केरळपासून गोव्यापर्यंत तयार झालेले नसल्याने बहुदा 14 वा 15 जूनपासूनच पावसाची शक्यता आहे.
पणजी वेधशाळेने पुढील 5 दिवसांसाठी पावसाच्या अंदाजात कोणतीच सूचना केलेली नाही वा कोणताही इशारा दिलेला नाही. मात्र किंचित हलकासा पावसाचा शिडकावप् होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. नियमित वेळेपेक्षा दोन दिवस अगोदर केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले खरे परंतु, केरळमध्ये दोन – तीन दिवस पडल्यानंतर पाऊस गायब झाला.
पावसाळी ढग कर्नाटकच्या किनारी भागातून वर सरले, तोपर्यंत हवामान खात्याने मान्सून पुढे सरकल्याचे वृत्त दिले खरे, आणि गेल्या आठवडय़ात हवामान खात्याने मान्सून कर्नाटकच्या कारवारमध्ये पोहोचला व तो किंचित प्रमाणात गोव्यात व कोकणमध्ये पोहोचेल असे म्हटले खरे, परंतु त्यानंतर पाऊस पडलाच नाही.
मान्सून केरळमध्ये पोहोचलाच नाही
दुसऱया बाजूने स्कायमॅट या एका हवामान अंदाज व्यक्त करणाऱया संस्थेने मान्सून केरळमध्ये पोहोचलाच नाही असा दावा केलेला आहे. आता यानंतर अधिकृतरित्या केरळमध्ये मान्सून पोहोचणार व त्यानंतर तो गोव्याकडे सरकणार असे म्हटलेले आहे. अलिकडे वर्ष दोन वर्षात भारतीय हवामान खात्याने जारी केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे, मात्र यावेळी पावसाळी ढगानेच वाकुल्या दाखविल्या. हवामान खाते ज्या इन्सॅट उपग्रहाद्वारे मिळणाऱया चित्राद्वारे पावसाचा अंदाज व्यक्त करते त्या चित्रावर आधारित केलेला अंदाजही फोल ठरला. त्यामुळे हवामान शास्त्रज्ञही चकीत झालेले आहेत.
मान्सून नेमका गेला कुठे?
केरळमध्ये खरोखरच मे अखेरीस मान्सून पोहोचला होता का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. भारतीय हवामान खात्याचा अंदाज अलिकडच्या वर्षात चुकत नाही. पंरतु यंदाच हा अंदाज थोडा चुकलाच. मान्सून नेमका गेला कुठे? आणि केरळमध्ये पडलेला पाऊस? तो खरोखरच मान्सून होता काय? या विषयावर आता भारतीय हवामान खात्यातील शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. हवामान खात्याने मान्सूनबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.
स्कायमॅटचा अंदाज
अलिकडेच स्कायमॅटने दिलेल्या माहितीनुसार, 14 जूनपासून गोव्यात पावसाची शक्यता आहे. गोव्याबाबत पुढील 15 दिवसांचा हवामान अंदाज जो व्यक्त करण्यात आलेला आहे त्यानुसार 14 जूनपासून पाऊस सुरु होईल. भारतीय हवामान खात्याने मात्र याबाबत काहीही मत व्यक्त केलेले नाही.
ढगाळ हवामान
रविवारी सायंकाळी राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले. परंतु पाऊस पडला नाही. सोमवारी एवढे ढगाळ वातावरण होते की कोणत्याही क्षणी पाऊस पडेल असे वाटत होते. मात्र पाऊस पडण्यासाठी ढगांमध्ये पोषक वातावरण तयार झाले नाही. सोमवारी हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कुठेही पावसाची शक्यता व्यक्त केलेली नाही. मात्र जोरदार वारे वाहण्याचा अंदजा वर्तविला आहे. शिवाय समुद्र खवळलेला राहील आणि वाऱयाचा वेग ताशी 60 कि.मी. पर्यंत जाईल व हे वातावरण दि. 10 जूनपर्यंत राहील असे म्हटलेले आहे.









