ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नववर्षाच्या सुरूवातीलाच पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात 19 रुपयांची दरवाढ केली आहे. सलग पाच महिने गॅसच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडत आहे.
गॅस कंपन्यांनी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या (14.2 किलो) दरात 19 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस 749 रुपयांना मिळणार आहे. तसेच व्यावसायिक सिलेंडरच्या (19 किलो) किंमतीत 29.50 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे या सिलेंडरसाठी 1325 रुपये मोजावे लागणार आहेत. सिंलिंडरचे नवीन दर आजपासून (बुधवार) लागू करण्यात येणार आहे.
मुंबईत घरगुती गॅस आता 684 रुपयांना मिळणार आहे. दिल्लीत तो 714 रुपयांना मिळेल. मागील पाच महिन्यांपासून गॅसच्या दरात वाढ होत आहे. चीन आणि अमेरिका यांमधील व्यापारी संघर्षाने जागतिक कमोडीटी बाजारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतींवर परिणाम होत आहेत.








