प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महिलांनी चूल पेटवून त्यावर चहा तयार केला. निमित्त होते महिला काँग्रेसच्या निषेध आंदोलनाचे. सिलिंडरचे वाढते दर आणि भडकती महागाई याचा निषेध म्हणून महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चूल मांडली आणि त्यावर चहा तयार केला.
सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे आता सिलिंडर परवडत नाही. यापुढे आमच्यावर चूल पेटविण्याचीच वेळ येणार आहे. असे सांगत महिलांनी राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध केला. सिलिंडरच नव्हे तर अन्नधान्याचे दर वाढले आहेत. अच्छे दिन हे केवळ दिवास्वप्न राहिले आहे. सरकारमुळे आमच्यावर ‘बुरे दिन’ आले आहेत. देशातील सर्वसामान्य जनता महागाईला वैतागली आहे. अशा प्रतिक्रिया आंदोलक महिलांनी व्यक्त केल्या.
काँग्रेस सरकारने सिलिंडरचा 50 रुपये दर वाढविल्यानंतर स्मृती इराणी यांनी देशभर सिलिंडर घेऊन काँग्रेस सरकारचा निषेध केला होता. आता सिलिंडर हजार रुपये झाला आहे, असे असताना स्मृती इराणी कोठे गायब झाल्या आहेत, असा प्रश्न करत आंदोलनकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. सिलिंडर गॅस दरवाढीबरोबरच पेट्रोल, डिझेल यांचे दरही गगनाला भिडले आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प का? काँग्रेसने 70 वर्षे सत्ता केली. मात्र देशाची संपत्ती विकली नाही. भाजपने मात्र देशाची संपत्ती विकण्याचा सपाटाच सुरू केला आहे. ‘नरेंद्र मोदीजी आम्हाला अच्छे दिन नको पूर्वीचे बुरे दिनच पाहिजे’ असे म्हणत तीव्र शब्दात भाजपचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. आर. पी. पाटील, यल्लाप्पा हुदली, लता माने, राजश्री नायक यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.









