प्रतिनिधी / बेळगाव :
स्मार्टसिटी योजनेच्या कामासाठी जेसीबीने खोदाई करताना भूमिगत गॅस पाईप लाईन फुटून गळती लागली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. गुरुवारी सकाळी कोल्हापूर सर्कल जवळ ही घटना घडली. 15 दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर घडलेली घटना ताजी असतानाच बुधवारी आणखी एक प्रकार घडला.
सिव्हिल हॉस्पिटलपासून कोल्हापूर सर्कलकडे जाणाऱया मार्गावर गुरुवारी सकाळी स्मार्टसिटी योजनेच्या कामासाठी खोदाईचे काम सुरु होते. त्यावेळी गॅस पाईपला गळती लागली. या परिसरात एकच धावपळ उडाली. तातडीने वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजुने रस्ता अडविला.
अग्निशामक दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मेघा गॅस एजन्सीच्या कर्मचाऱयांनी तब्बल एक ते दीड तास प्रयत्न करुन गळती बंद केली. सकाळी 10 पासून अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी तळ ठोकून होते. या गळतीमुळे शाहूनगर परिसरातील गॅस पुरवठा बंद होता.
स्मार्टसिटी योजनेतून सुरु असलेल्या खोदाईमुळे वारंवार शहर व उपनगरांत गॅस गळतीच्या घटना घडू लागल्या आहेत. गुरुवारी सकाळी घडलेल्या घटनेत केवळ सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. वाहतूक पोलिसांनी चन्नम्मा सर्कल व कोल्हापूर सर्कल जवळ रस्ते अडविल्याने वाहन धारकांना मात्र त्रास सहन करावा लागला.









