लंडन / वृत्तसंस्था
सरे कौंटी क्लबने 2022 हंगामासाठी माजी इंग्लिश फिरकीपटू गॅरेथ बॅटीची मुख्य अंतरिम प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली. बॅटी यांनी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर याच संघासाठी सर्व क्रिकेट प्रकारात सहायक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. आता ते विक्रम सोळंकी यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा अझहर महमूदकडे असेल. अझहर मार्चमध्ये रुजू होण्याचे संकेत आहेत.
बॅटी यांना सरे संघाशी प्रथमच करारबद्ध झालेल्या जिम ट्रॉटन यांचे सहाय्य लाभेल. टॉटन हे वार्विकशायर संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहिले असून गतवर्षी त्यांनी सॉमरसेट संघाचे फलंदाजी सल्लागार म्हणून काम पाहिले. आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी इंग्लंडतर्फे 6 वनडे सामने खेळले. शिवाय, 2012 कौंटी चॅम्पियनशिपमध्ये वार्विकशायर संघाचे नेतृत्वही सांभाळले आहे.









