शासकीय कागदपत्रे मिळविण्यासाठी धावपळ : झेरॉक्सच्या मागणीत वाढ
प्रतिनिधी/ बेळगाव
गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. विशेषत: शासकीय कागदपत्रे जमा करताना दमछाक होऊ लागली आहे. काही नागरिकांकडे आधारकार्ड, रेशनकार्ड, जातप्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी धावपळ दिसून येत आहे.
सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. त्यापैकी महिलांना मोफत बसप्रवास सुरू झाला आहे. त्यापाठोपाठ गृहज्योतीसाठी अर्ज भरणी सुरू झाली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. विशेषत: शासकीय कागदपत्रे जमवाजमव करण्यासाठी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. शासकीय कागदपत्रांना महत्त्व आले असून झेरॉक्स सेंटर आणि ऑनलाईन सेंटरवर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.
शासकीय कागदपत्रे आवश्यक
शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवास, गृहलक्ष्मी अंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला मासिक 2000 रुपये, गृहज्योतीअंतर्गत 200 युनिट मोफत वीज, अन्नभाग्य योजनेंतर्गत माणसी दहा किलो तांदूळ वितरीत केले जाणार आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कागदपत्रे आवश्यक आहे. कागदपत्रे मिळविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू झाली आहे.
गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड, आधारकार्ड, जातप्रमाणपत्र, बँक पासबुक, फोटो आवश्यक आहे. त्यामुळे कचेरी गल्ली, कोर्टपरिसर, शनिवार खूट, आदी ठिकाणी नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे. ऑनलाईन सेंटर आणि झेरॉक्स सेंटरवर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे ऑनलाईन सेंटर आणि झेरॉक्स सेंटरला अच्छे दिन आल्याचे दिसत आहेत.









