वार्ताहर / राजापूर
राजापूर तालुक्यातील केळवली येथे घरी विलगीकरणात असलेल्या एका कोरोनाबाधित रूग्णाने घरातून पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा रूग्ण शिक्षक असून त्याने थेट आपले मूळ गाव कुडाळ गाठल्याचे बोलले जात आहे.
गुरूवारपर्यंत तालुक्यातील ऍक्टीव्ह रूग्णांचा आकडा 58 झाला होता. तालुक्यात कोविड केअर सेंटर नसल्याने सौम्य लक्षणे असणाऱया रूग्णांचे घरातच विलगीकरण करण्यात येत असून काही रूग्णांना रत्नागिरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात येत आहे. गुरूवारी केळवली येथील प्राथमिक शाळेवर नियुक्ती असलेल्या एका शिक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य विभागाने त्यांचे स्वतंत्र खोलीत विलगीकरण केले. दुसऱया दिवशी आरोग्य विभागाचे कर्मचारी चौकशी करण्यासाठी गेले असता रूग्ण घरात नसल्याचे निदर्शनास आले. संबंधित शिक्षक हे मुळचे कुडाळ येथील असून ते गुरूवारी सायंकाळी कुडाळ येथील आपल्या घरी निघून गेल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनाबाधित असतानाही शिक्षकाने राजापुरातून पळ काढल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित शिक्षकाने मुलाच्या दुचाकीवरून राजापूर ते कुडाळ प्रवास केल्याची माहितीही पुढे आली आहे. दरम्यान आरोग्य विभागाने कुडाळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून या बाबत माहिती दिली. कोरोनाबाधित असताना विलगीकरणातून पळ काढल्याने संबंधित शिक्षकावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.








