मराठा आरक्षणाचा राजधानीत मुद्दा पेटला
प्रतिनिधी / सातारा
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याचा मुद्दा राजधानी सातारा येथे पेटू लागला आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या कोयना दौलत निवासस्थानासमोर शेण्या पेटवल्या तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या इमारतीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे सातारा शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन दगडफेकीची पाहणी करत शांततेचे आवाहन करण्यात आले.
मराठा आरक्षण रद्द केल्याने त्याचे पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत. सातारा जिल्ह्यातही ठिकठिकाणी वेगळ्या पध्दतीने आंदोलने केली जाऊ लागली आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या कोयना दौलत निवासस्थानी शेण्या आणून ठेवल्या अन त्या पेटवून दिल्या. तसेच शहरातील काँग्रेस कमिटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.त्यांनी शेण्या विझवल्या.त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहपोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पहाणी केली. त्यांनी अधिक तपासासाठी पोलिसांना सूचना केल्या आहेत.
कार्यकर्त्यांनी शांत रहावे:आमदार शशिकांत शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस भवनावर ही अज्ञात व्यक्तींनी सकाळी दगडफेक केली. काचांचा आवाज आल्यामुळे भवनातील कार्यकर्ते बाहेर आले. त्यामुळे गेटवरून उडी मारून संबंधित पळून गेल्याचे निदर्शनास आल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तसेच काँग्रेस भवनावरही दगडफेक झाली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. याची माहिती आमदार शशिकांत शिंदे यांना मिळताच ते राष्ट्रवादी कार्यालयात पोहचले.त्यांनी पाहणी केली.अन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन त्यांनी केले.