कोरोना काळातील डय़ुटीचे गृहमंत्र्यांकडून कौतुक
प्रतिनिधी/ रत्नागिरी
या कोरोना काळात 3 महिने सतत डय़ुटी करून समाजाला सुरक्षित ठेवण्याची महत्वपूर्ण कामगिरी महाराष्ट्र पोलीस करत आहेत. मुंबई-पुण्यातील शेकडो पोलीसांना या काळात डय़ुटी करताना कोरोनाची लागण झाली यामध्ये अनेक पोलीसांना आपला जीवदेखील गमवावा लागला अशा कठीण काळात रस्त्यावर उभे राहून डय़ुटी करणाऱया पोलीस बांधवांचे कौतुक फोनकरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केले जात आहे. बुधवारी रत्नागिरी पोलीस दलातील काही लोकांनाही हा कॉल आला होता, ‘तुम्ही कसे आहात, तुमचे सर्वांचे कौतुक आणि स्वत:ची काळजी घ्या,’ या फोनमुळे पोलीस कर्मचाऱयांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ज्या दिवसापासून लॉकडाऊन जाहीर झाला आहे अगदी त्या दिवसापासून रत्नागिरीच नव्हे तर महाराष्ट्रातील पोलीस रस्त्यावरची, सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी दिवसरात्र डय़ुटी करत आहे. सुरूवातीला लॉकडाऊनचे नियम कडक असताना पोलीसांमुळेच कोरोना आटोक्यात आला होता कारण नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस चोखपणे आपली डय़ुटी बजावत होते इतकेच नव्हे तर कोरोनासंदर्भात नागरिकांनी अधिक अलर्ट राहावे यासाठी जनजागृतीचे अनेक उपक्रम रत्नागिरी जिल्हय़ातही घेण्यात आले. दोन महिने उलटून गेले तरी कोरोनाची संख्या कमी होत नसल्याने हळूहळू जनजीवन पूर्ववत करण्यासाठी शासनाने थोडी शिथिलता आणली त्यामुळे पोलीसांवरही थोडी मर्यादा सध्याच्या काळात आली आहे. मात्र 17 मार्चपासुन अगदी 22 मे पर्यंत पोलीसांनी केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे.
अजूनही कंन्टेमेंट झोन असेल व इतर भागात पोलीस 24 तास डय़ुटी करत आहेत, त्यामुळे गृहमंत्र्यांनी फोनव्दारे पोलीसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुंबई पोलीसांना तर गृहमंत्री थेट भेटून त्यांना मनोबल देत आहेत मात्र इतर जिल्हय़ातील पोलीसांनाही दिलासा देण्यासाठी फोनव्दारे मनोबल वाढण्याचा प्रयत्न करत आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील काही कर्मचाऱयांना बुधवारी कॉल आला, ‘हॅलो मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय, कसे आहात, कोरोना काळात तुम्ही सर्वांनी चांगली डय़ुटी केली, स्वत:ची काळजी घ्या’ या वाक्याने कर्मचारीही भारावून गेले. सुरूवातीला कर्मचारी अवाप् झाले, गृहमंत्र्यांचा कॉल कसा असेल पण हा कॉल जरी थेट नसला तरी रेकॉडींग केलेला होता, एकावेळी सर्वांशी बोलणे शक्य नसल्याने गृहमंत्री देशमुख यांनी रेकॉडींग कॉलव्दारे संवाद साधला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेकॉडींग कॉलव्दारे एकाच महाराष्ट्रातील हजारों पोलीसांचे मनोबल वाढविणारा संदेश दिला. असे यापूर्वी कधीच झाले नव्हते भले गृहमंत्र्यांचे संभाषण रेकॉडींग करून एकाचवेळी कर्मचाऱयांशी संपर्क साधण्यात आला असला तरी हे आमच्यासाठी खरच समाधानकारक बाब आहे, हा अनुभव आमच्यासाठी वेगळा असल्याचे रत्नागिरीतील पोलीस कर्मचाऱयांनी व्यक्त केली आहे.









