कारखान्यांच्या हंगामावर संकट ?, तीन टप्प्यातील एफआरपीचा तिढा, शेतकरी संघटना आक्रमक
कोल्हापूर :फोटो- 9856 शशीकांत मोरे
विठ्ठल बिरंजे/कोल्हापूर
कोल्हापूर विभागातील जॅगरी प्रकल्पांसह गुराळघरांची धुराडी पेटल्याने ऊस तोडी धडाक्यात सुरु आहे. तर दुसऱया बाजूला 15 ऑक्टोबरपर्यंत हंगाम सुरु करण्यास निर्बंध घातल्याने आधीच चलबिचल झालेलेल्या कारखानदारांची चिंतेत भर पडली आहे. तीन टप्प्यातील एफआरपीवरुन शेतकरी संघटनानी रान पेटवण्यास सुरुवात केल्याने हंगाम आणखी लांबणीवर पडतो की काय या भितीने कारखानदारांना भंडावून सोडले आहे. एकूणच कारखानदारीचा यंदाचा हंगाम धास्तीखाली आहे.
60 हजार 800 हेक्टरवरील ऊस खराब
पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारी मजबूत आहे. राज्यातील अन्य कारखान्यांची एफआरपी थकीत असली तरी जिल्ह्यातील कारखाने अपवाद आहेत. किंबहुना जवाहर कारखान्याने एफआरपीपेक्षाही अधिक दर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यंदा अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिरोळ, हातकणंगले, करवीरसह नदी काठावरील तालुक्यांमध्ये सर्वाधिक फटका बसला. जिह्यात 60 हजार 800 हेक्टरवरील ऊस महापुराने बाधित झाला. याचा विपरित परिणाम गाळप हंगामावर होणार आहे. याचा फटका कारखानादारीला बसणार आहे.
महापुरातील ऊस तोडणार कोण?
यंदा महापुरामुळे खराब झालेला ऊस प्राधान्याने तोंडण्याचे आदेश कारखानदारांनाच दिले आहेत. हे नवीन संकट कारखानदारीसमोर आहे. एकाचवेळी खराब ऊस गाळप केला तर पहिल्या टप्प्यातील साखर उताऱयावर परिणाम शक्य आहे. बरोबर याच्या उलट चित्र गूळ हंगामाचे आहे. चांगला दर्जा आणि परिपक्व ऊस तोडला जात आहे, गूळ असो की साखर यासाठी ऊसच लागतो. त्यामुळे खराब ऊस कारखान्यांनीच तोडावा असे बंधन का असा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कारवाईच्या भितीने कारखानदार थंड
घटलेल्या ऊस क्षेत्राचा विचार करुन हा विचार करुन हंगाम सुरु करण्याची तयारी कारखानदारांनी केली होती. विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकातील ऊसतोड मजुरही कारखान्यांवर दाखल झाले. मात्र 15 ऑक्टोबरपूर्वी गाळप सुरु न करण्याचा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्याने अपेक्षाभंग झाला. कारखान्यांची सर्वच यंत्रणा जागच्याजागी थांबली तर या उलट जॅगरी आणि गुराळांची धुराडी मात्र जोमात सुरु आहेत. त्यांना शासनाचे कोणतेही बंधन नाही. कोल्हापूर विभागात पाच जॅगरी प्रकल्प तर 250 गुराळघरं आहेत. यांच्या तोडी सुरु झाल्याने कारखानदारांची आणखी चिंता वाढली आहे. हंगाम लांबला तर कार्यक्षेत्रातील ऊस या प्रकल्पांना जाईल आणि कारखान्यांना पूर्ण क्षमतेने गाळप करण्यासाठी कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस आणावा लागेल. ऊसाची पळवापळवी होणार या शक्यतेने चिंतेत भर घातली आहे.
शेतकरी संघटनांची धास्ती
प्रत्येक हंगामाच्या तोंडवर नवा मुद्दा घेऊन शेतकरी संघटना कारखानादीच्या विरोधात आक्रमक होतात. यंदा तीन टप्प्यातील एफआरपीचे आयते कोलीत संघटनांच्या हातात मिळालेले आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणमुळे तीन टप्प्यातील एफआरपीचा मुद्दा पुढे आला. असला तरी शेतकरी संघटनांच्या रडारवर कारखानेच आले आहेत. जो पर्यंत एकरकमी एफआरपीचा निर्णय होत नाही. तोपर्यंत गाळप सुरु होणार नाही. असा इशाराच शेतकरी नेत्यांनी दिला आहे, याच मुद्यावर जय शिवराय संघटनेचा सोमवार 11 ला पेठवडगांव येथे मेळावा होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघनेने 19 ला ऊस परिषद बोलावली आहे. तर आंदोलन अंकुशने त्यापाठोपाठ एल्गार परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदा वेगवेळ्या होत असल्या तरी एफआरपीच्या मुद्यावरच पुढील आंदोलने होणार असल्याने सध्या तरी हंगामावर अडचणी निर्माण होऊ शकतात असे चित्र आहे.
कोल्हापूर विभाग
एकूण कारखाने 38
उपलब्ध ऊसक्षेत्र 2.68 लाख हेक्टर
महापुराने नुकसान 60800 हेक्टर
जॅगरी प्रकल्प 05
गुराळघरं 250