तालुक्यात एकही वाईनशॉप नाही!
प्रतिनिधी/ गुहागर
तालुक्यामध्ये एकही वाईनशॉप नाही. मात्र बिअरशॉपीची 4 व देशी दारू व्यावसायिकांची 3 दुकाने शुक्रवारपासून सुरू झाली आहेत.
तालुक्यात गुहागर, शृंगारतळी, पालशेत याठिकाणी बार आहेत, परंतु बारकरिता परवानगी नाही. यामुळे बिअरशॉपी व देशी दारूची दुकाने सुरू झाली आहेत. बिअरशॉपीची शृंगारतळीत, मोडकाघर, अडूर, अंजनवेल अशी चार दुकाने, तर शृंगारतळी, तळवली व शीर येथे प्रत्येकी 1 अशी 3 देशी दारू दुकाने आहेत. ही 7 दुकाने सुरू झाली आहेत. शृंगारतळीतील हेमंत बिअर शॉपीमध्ये दुकानासमोर 6 फुटाचे अंतर ठेऊन जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच आलेल्या व्यक्तीच्या हातावर सॅनिटायझर व आलेला ग्राहक नियमात उभा राहण्यासाठी दुकानदारांनी दोन कर्मचारी नेमले आहेत. यामुळे सुरक्षितपणे दारू विकण्याचे काम सुरू आहे.
गुहागरातील दारूची दुकाने सुरू करण्यावर उत्पादन शुल्क विभागाचे नियंत्रण आहे, परंतु या दुकानांवर गर्दी दिसली तर मात्र ती बंद करण्याचा अधिकार पोलीस व तहसीलदार यांना असल्याचे येथील प्रशासनाने सांगितले. कमीप्रमाणात बिअरशॉपी असली तरी दुकानदारांनी केलेल्या नियोजनामुळे गर्दीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश महसूल प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहे.









